अकोला दिव्य ऑनलाईन : सीए शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड ऑफ स्टडीज आयसीएआय सातत्याने शैक्षणिक साहित्य निर्माण करीत असून भारतात व विदेशात सीएची परीक्षा जेथे होते, तेथे शैक्षणिक साहित्य व सिल्याबस बोर्ड ऑफ स्टडीज निर्माण करीत असतो. या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात सफल होणे यासाठी बोर्ड ऑफ स्टडीज सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे मत आयसीएआय सेन्ट्रल कौन्सिल सदस्य व बोर्ड ऑफ स्टडीजचे चेअरमन डॉ राजकुमार अडुकिया यांनी व्यक्त केले. अकोला शहरातील आयसीएआय अकोला शाखेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत सीए विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य निर्मितीच्या संदर्भात सीए डॉ.अडुकिया यांनी माहिती दिली.
आयसीएआय अकोला शाखेचे चेअरमन सीए सुमित अलिमचंदानी, शाखेचे सचिव सीए हिरेन जोगी, सीए रमेश चौधरी यावेळी उपस्थित होते. सनदी लेखापाल शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड ऑफ स्टडीज सातत्याने शैक्षणिक पॉलिसीच्या अनुषंगाने शैक्षणिक साहित्यात वारंवार बदल करून ते अपडेट करीत असते. विद्यार्थ्यांना सातत्याने त्याचा लाभ होत असल्याचेही सीए डॉ.अडुकिया यांनी सांगितले. यावेळी सीए डॉ.अडुकिया यांनी सीए शाखेतील विद्यार्थी शिक्षण, राष्ट्राच्या विकासात सनदी लेखापालची भूमिका तथा सीए का व्हावे याबद्दल माहिती देत शंकांचे निरसन केले. यावेळी सीए परीक्षेत देशातून द्वितीय आलेला अकोल्यातील युग कारिया व राष्ट्रीय रँक पटकाविलेल्या अन्य तीन सीए विद्यार्थ्यांचा सन्मान केला.यावेळी आयसीएआय अकोला शाखेचे पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.