Thursday, December 12, 2024
Homeताज्या बातम्याअर्धेअधिक नागपुर जलमय ! ७ तासात तब्बल २२७ मि.मी. पाऊस; हजाराहून अधिक...

अर्धेअधिक नागपुर जलमय ! ७ तासात तब्बल २२७ मि.मी. पाऊस; हजाराहून अधिक वस्त्या जलमय

अकोला दिव्य ऑनलाईन : अतिवृष्टीने नागपूरकरांना जाेरदार तडाखा दिला असून अर्धेअधिक नागपुर जलमय झाले आहे. आज शनिवारी सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण नागपुरात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून हजाराच्यावर वस्त्या जलमय झाल्या आहेत. सर्व नाले ओसंडून वाहत आहेत. रस्त्यावर पाणीच पाणी असून शेकडाे लाेकांची घरे पाण्यात बुडाली आहेत. पहाटेपासून दुपारी १२ वाजतापर्यंत मुसळधार पावसाची संततधार सुरू हाेती. ७ तासात तब्बल २२७.२ मि.मी. पावसाची नाेंद झाली. गेल्या वर्षी २३ सप्टेंबरनंतर नागपुरात आज पुन्हा पुराची परिस्थिती निर्माण झाली असून शहरभर अक्षरश: हाहाकार उडाला आहे.

मान्सून दाखल हाेवून महिनाभर झाल्यानंतरही उकाड्याचा त्रास सहन करणाऱ्या नागपूरकरांना जाेरदार पावसाची प्रतीक्षा हाेती. या माेसमात शनिवारी पहिल्यांदा नागपूरकरांनी पावसाचा जाेर अनुभवला पण ताे त्रासदायक ठरला. पहाटे ५ वाजतापासून विजांच्या थयथयाटासह पावसाला सुरुवात झाली. ही एकसारखी मुसळधार दुपारी १२ वाजतापर्यंत सतत सुरू हाेती. या अतिवृष्टीमुळे नागपूरकरांची दाणादाण उडाली. उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्चिम सर्व भागातील शेकडाे वस्त्या जलमय झाल्या आहेत.वाठाेडा, पारडी, चिखली, एचबी टाउन, वर्धमाननगर, केसरमातानगर, बाबा फरीदनगर, गायत्रीनगर, आराधनानगर, स्वावलंबीनगर, दीनदयालनगर, रविंद्रनगर, डिप्टी सिग्नल, स्वामीनारायण मंदिर, कळमना, वाठाेडा ले-आउट, गाेपालकृष्णनगर, विद्यानगर, संकल्पनगर, शेषनगर या परिसरातील बहुतेक वस्त्या जलमय हाेत्या. कळमना नाल्याजवळची वस्ती पाण्याने वेढली हाेती.

दक्षिणेकडे मानेवाडा, बेसा राेड, घाेगली राेड, हुडकेश्वर राेड या भागातील वस्त्या पाण्याने वेढल्या हाेत्या व अनेक वस्त्यांचा मुख्य शहराशी संपर्क तुटला हाेता. लाेकांची घरे अक्षरश: पाण्यात बुडाली हाेती. या भागातील शेकडाे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. शताब्दी चाैक ते मनीषनगर रस्ता जलमय झाल्याने मार्गावर वाहतूक बंद झाली. नरेंद्रनगर, श्रीकृष्णनगर, पडाेळे चाैक, हिवरी ले-आउट, देशपांडे ले-आउट, जयताळा, शंकरनगर, शिक्षक काॅलनी, काशीनगर, बालाजीनगर, भाकरे ले-आउट, उत्तर नागपुरात वैशालीनगर, इंदाेरा, दीक्षितनगर, केजीएन साेसायटी, फ्रेन्ड्सकाॅलनी या भागातील असंख्य वस्त्या जलमय झाल्या हाेत्या.

शहरातील नाल्यावरील सर्व पूलावरून पाणी वाहत हाेते, तर अंडरपास पाण्याने भरले हाेते. शहरालगतच्या बहुतेक वस्त्या पाण्यात बुडाल्या. शेकडाे लाेकांच्या घरात पाणी जमा झाले असून अन्नधान्य, कपडेलत्ते, फर्निचर असे सर्व काही पाण्यावर तरंगताना दिसत आहे. २३ सप्टेंबर २०२३ राेजी नागपूरकरांनी पूर अनुभवला पण त्याची व्याप्ती काही भागापुरती हाेती. मात्र शनिवारी शहरातील सर्वच भागात पूरसदृश्य स्थितीचा फटका बसला.

अनेक वस्त्यांचा वीज पुरवठा बंद
विजांच्या कडकडाटासह वादळी व मुसळधार पावसामुळे शहरातील शेकडाे वस्त्यांचा वीज पुरवठा बंद पडला. अनेक भागात विजेच्या तारांवर झाडे उन्मळून पडल्याचेही सांगण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!