Saturday, September 21, 2024
Homeअपघातअकोल्याच्या महिलांना टँकरनं चिरडलं ! तेल्हारा येथील 2 ठार, तीन जखमी ;...

अकोल्याच्या महिलांना टँकरनं चिरडलं ! तेल्हारा येथील 2 ठार, तीन जखमी ; बद्रीनाथवरुन परतताना काळाचा घाला

Devotee Died In Badrinath Accident : अकोला दिव्य ऑनलाईन : बद्रीनाथ दर्शन करुन परतणाऱ्या महिलांना भरधाव टँकरनं चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथील दोन महिलांचा मृत्यू झाला, तर तीन महिला गंभीर जखमी आहेत. ही घटना उत्तराखंडमधील श्रीकोट श्रीनगरमध्ये मंगळवारी रात्री घडली. या अपघातातील तीन गंभीर जखमी महिलांना श्रीनगर गढवाल इथल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ललिता हरीश टावरी ( वय 50 तेल्हारा) आणि सरिता उर्फ गौरी नरेश भैय्या ( वय 50 तेल्हारा ) अशी मृत झालेल्या भाविकांची नावं आहेत. तर सारिका राजेश राठी (46), संतोषी धनराज राठी (45), मधुबाला राजेंद्र कुमार (54) अशी जखमी झालेल्या महिलांची नावं आहेत. हॉटेलच्या बाहेर महिला बोलत असताना भरधाव टँकरनं त्यांना चिरडलं, अशी माहिती मिळाली आहे.

अकोला येथील भाविक बद्रीनाथ येथे दर्शनासाठी गेले होते. त्यांच्यासमवेत अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील काही भाविकांचा समावेश होता. यावेळी बद्रीनाथ येथून परत येताना भाविक महिला श्रीकोट येथील हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. मंगळवारी रात्री भाविक महिला हॉटेलबाहेर बसून बोलत होत्या. मात्र त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या टँकरनं या महिलांना चिरडलं. याबाबत माहिती देताना कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक होशियार सिंह पंखोली यांनी सांगितलं की, श्रीनगरहून श्रीकोटच्या दिशेनं जाणारा पाण्याचा भरधाव टँकर नियंत्रणाबाहेर गेला. या टँकरनं प्रथम गायीच्या वासराला धडक दिली. त्यानंतर टँकर भिंत तोडून आत घुसून त्यान महिला भाविकांना चिरडलं. टँकरखाली दोन महिला चिरडल्या गेल्या. या महिलांना जेसीबीच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं.

या भीषण अपघातात ललिता टावरी यांचा जागीच मृत्यू झाला, तर सरिता उर्फ गौरी भैय्या यांना श्रीनगरमधील गढवाल येथील बेस हॉस्पीटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं. इतर तीन महिलांवर उपचार सुरू असून एका महिलेचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. दोघींना किरकोळ दुखापत झाली. जखमी झालेल्या भाविकांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!