Saturday, December 14, 2024
Homeराजकारणनांदेड येथे परिवर्तन आघाडीचे 4 सप्टेंबरला शक्तिप्रदर्शन - राजू शेट्टी

नांदेड येथे परिवर्तन आघाडीचे 4 सप्टेंबरला शक्तिप्रदर्शन – राजू शेट्टी

अकोला दिव्य ऑनलाईन : स्वतंत्र भारत पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जय विदर्भ पार्टी व महाराष्ट्र विकास आघाडी संयुक्तपणे एकत्रित येत परिवर्तन आघाडीची स्थापना केली आहे.नव्याने स्थापित परिवर्तन आघाडीकडून येत्या 4 सप्टेंबरला नांदेड येथील मुंडा नाक्यावर दुपारी एक वाजता शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. राज्यभरातून लाखो शेतकरी उपस्थित राहतील असा निर्धार परिवर्तन आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

संत नगरी शेगाव येथे शनिवार 24 ऑगस्टला पार पडलेल्या मेळाव्यात परिवर्तन आघाडीचे नेते राजू शेट्टी, शंकर अण्णा धोंडगे पाटील, वामनराव चटप, ललित बहाळे, अरुण केदार यांनी हा निर्धार व्यक्त केला.
वर्तमान परिस्थितीवर भाष्य करीत सर्व नेत्यांनी आपल्या भाषणातून युती सरकारवर प्रहार करत सांगितले की, ‘शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारी धोरण’ या प्रवृत्तीला ठेचून काढणे आवश्यक आहे. सध्याच्या इकडे आड, तिकडे विहीर, या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी या सगळ्यांसाठी परिवर्तन आघाडीचा पर्याय खुला आहे. यामध्ये नवीन तरुणांना संधी देण्यात येईल, अशी घोषणा कार्यक्रमात करण्यात आली.
यावेळी प्रशांत डिक्कर, अरुण केदार, अण्णा पाटील, शंकर अण्णा धोंडगे, ललित बहाळे, राजू शेट्टी व वामनराव चटप यांची समायोजित भाषणे झालीत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वभापचे राज्य अध्यक्ष मधुसूदन हरणे तर सूत्रसंचालन धनंजय मिश्रा व अविनाश पाटील नाकट आणि आभार प्रदर्शन वामनराव जाधव यांनी केले.
या कार्यक्रमाला राज्यभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यामध्ये दासा पाटील, समाधान पाटील, गोवर्धन गावंडे, विलास ताथोड, डॉ. निलेश पाटील, सुरेश जोगळे, जोशना बहाळे, जसराज बहाळे, दामोदर शर्मा, राजाभाऊ पुसदकर, विजय निवल प्रामुख्याने उपस्थित होते. वामनराव चटप यांनी सर्वांना शपथ दिल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला राज्यभरातील विविध शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!