अकोला दिव्य ऑनलाईन : महाराष्ट्र राज्यात सरकारमधे असलेल्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि ईगल इन्फ्रा कंपनीचे विभागीय संचालक राम प्रकाश मिश्रा यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारे मारेकरी अद्यापही मोकाट आहेत. विशेष म्हणजे राज्याचे गृहमंत्री विदर्भाचे असताना आज जवळपास १५ दिवस होऊन गेले असताना, मिश्रांच्या मारेकऱ्यांचा अकोला पोलिस शोध घेऊ शकले नाहीत. तेव्हा सर्वसामान्य माणसाचा वाली कोण ? भाजप उत्तर भारतीय सेलचे उपाध्यक्षावर दोन अज्ञात व्यक्तींनी चाकूने पोट, छाती आणि हातावर सपासप वार करुन प्राणघातक हल्ला केल्याची घटना २८ ऑगस्टला घडली आहे.
अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचार झाल्याने प्रकृती स्थिर होताच नागपूर येथील संचेती हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. त्याठिकाणी त्यांच्या पोटातील इजा झालेल्या शिरांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. नशिबाने मिश्रा बचावले.पण आज १५ दिवस उलटून गेले तरी त्यांच्या मारेकऱ्यांना शोधून काढण्यात अकोला पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा अपयशी ठरले आहे. अलिकडच्या काळात अकोला शहर व जिल्ह्यातील गुन्ह्याचा आलेख वाढत चालला आहे.

अकोला शहरातील गल्लीबोळात व बाजारपेठेत खुलेआम वरली मटका सुरू आहे. ग्रामीण भागात अवैध दारू विक्री तसेच अवैध धंदे सुरू आहेत. मात्र गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करुन स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्यात धन्य होतात.अलिकडच्या काळात अकोला शहर व जिल्ह्यातील गुन्ह्याचा आलेख वाढत चालला आहे. गुन्हेगारांवर वचक राहिला नाही तर महिला विनयभंग व लाचखोरीच्या प्रकाराने अकोला पोलिसांची प्रतिमा कलंकित होतं आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोला शहरात येऊन नशेच्या (बटण) गोळ्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करुन, अकोला पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगून ठेवले.