Saturday, October 5, 2024
Homeताज्या बातम्याकुप्रसिध्द आमदार संजय गायकवाडने पुन्हा आपली लायकी व पातळी दाखवून दिली -...

कुप्रसिध्द आमदार संजय गायकवाडने पुन्हा आपली लायकी व पातळी दाखवून दिली – पटोलेंचा इशारा

अकोला दिव्य ऑनलाईन : बुलडाण्याचा कुप्रसिध्द आमदार संजय गायकवाड याने पुन्हा एकदा आपली लायकी आणि पातळी दाखवून दिली आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची जीभ कापणा-यास ११ लाखांचे बक्षीस जाहीर करणा-या या गुंड प्रवृत्तीच्या आमदाराच्या वक्तव्याची सरकारने गंभीर दखल घ्यावी. त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्या मुसक्या बांधाव्या अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते या गुंडांचा बंदोबस्त करतील असा खणखणीत इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, जननायक राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता बघून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे हताश आणि निराश झालेले सत्ताधारी राहुलजींच्या वक्तव्याची मोडतोड करून विपर्यास करून त्यांच्या बदनामीची मोहिम चालवत आहेत. राहुल गांधी कधीही आरक्षण बंद करू असे म्हटले नाहीत. उलट आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवून ज्या समाजाचे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवू असे म्हटले आहेत. पण भारतीय जनता पक्ष फेक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यांच्या मित्रपक्षांचे गुंड प्रवृत्तीचे लोक तर त्यापुढे जाऊनजीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. सरकार या गुंडावर कारवाई का करत नाही, त्यामुळे देशात कायद्याचे राज्य आहे की भाजपाच्या गुंडांचे असा प्रश्न जनतेला पडला आहे?

संजय गायकवाड सारख्या अडाणी लोकांना राहुल गांधी अमेरिकेत काय बोलले ते माहित तरी आहे का? राहुल गांधी मोदी, शाह यांना घाबरत नाहीत. संजय गायकवाड सारख्या गावगुंडांच्या धमक्यांना ते घाबरणार नाही. महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी काँग्रेस कार्यकर्ते ढाल बनून त्यांचे संरक्षण करायला सज्ज आहेत. त्यांच्या केसाला धक्का लावायचा प्रयत्न तर सोडा विचारही करू नका असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!