अकोला दिव्य ऑनलाईन : श्री समर्थ पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, रिधोरा येथे नुकताच ‘महोत्सव संविधानाचा’ हा संविधान गौरव कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ. एम. आर. इंगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संविधानाच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करीत संविधान निर्मितीच्या ऐतिहासिक प्रक्रियेचे सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत विवेचन केले.
कार्यक्रमाची सुरुवात ‘संविधान दिंडी यात्रा’ या रूपात संविधान रॅलीने झाली. विद्यार्थ्यांनी संविधानाची प्रत तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांची प्रतिमा पालखीत ठेवून, लेझीम व बँडच्या तालावर पदन्यास करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. संविधानाला पुष्प अर्पण करत त्याचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गासाठी स्वतःचे संविधान तयार केले होते, ज्याचा उद्देश संघभावना निर्माण करणे आणि संविधानाच्या निर्मितीत घेतलेल्या कष्टांची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणे हा होता. विद्यार्थ्यांनी संविधान सन्मान सांस्कृतिक कार्यक्रम सादर संविधानाला आदरांजली वाहिली. विद्यार्थ्यांनी संविधान उद्देश पत्रिकेचे मराठी व इंग्रजी या भाषेत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच विद्यार्थ्यांची समायोचित भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. प्रदीप अवचार यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी श्याम राऊत होते. प्रमुख पाहुणे क्लस्टर प्रमुख गोपाळ सुरे, संस्थेचे अध्यक्ष नितीन बाठे, श्री समर्थ पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज व्यवस्थापन सदस्य योगेश जोशी, शैक्षणिक संचालक डॉ. जी. सी. राव, प्रा.डॉ.प्रदीप अवचार, सरस्वती हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका संगीता गरड आणि शैक्षणिक प्रमुख सुवर्णा गुप्ता, प्राचार्य अश्विनी थानवी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्याम राऊत म्हणाले की, त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात संविधानाचा असा भव्य कार्यक्रम पहिल्यांदाच पाहण्यास मिळाला. देशभरात अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या निमित्ताने श्री. समर्थ पब्लिक स्कूलने एक गौरवपूर्ण पायंडा पाडल्याचे ते बोलले. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी केलेल्या परिश्रमांचे कौतुक करत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष अभिनंदन केले. शाळेचे अध्यक्ष नितीन बाठे यांनी सर्वोत्तम तीन वर्गांचे संविधान घोषित केले. विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवले. भारतीय संविधानाच्या शिल्पकारांच्या जीवनातील काही प्रेरणादायी घटनांचे वर्णन केले. विद्यार्थ्यांना राष्ट्रसेवेच्या दिशेने प्रेरित केले. देशभक्तीचे नारे देऊन वातावरण राष्ट्रप्रेमाने भारावून टाकले. विद्यार्थ्यांना संविधानाच्या शिल्पकारांच्या पावलांवर चालण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्या अश्विनी थानवी यांच्या समवेत संपूर्ण शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.
वरिष्ठ शाळा समन्वयक प्रेमेंद्र पळसपगार यांनी सूत्रसंचालन, तर आभार प्रदर्शन पुरूषोत्तम मुरकर यांनी केले.