अकोला दिव्य ऑनलाईन : भारताचे प्रसिद्ध उद्योजक आणि टाटा या नावाजलेल्या कंपनीचे सर्वेसर्वा उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी बुधवार ९ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा निधन झालं आहे. रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देश हळहळला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना बुधवारी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र अखेर वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांनी देशासाठी दिलेलं योगदान हे खूप मोठं आहे. तसंच रतन टाटा यांच्याविषयी संपूर्ण देशाला वेगळीच आपुलकी होती यात काहीही शंका नाही. देशभक्ती आणि देशहिताचे आदर्श, उद्योग जगतातले पितामह अशी रतन टाटांची ओळख होती.

महत्त्वाचे म्हणजे तीन दिवसांपूर्वीही रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त होते. मात्र, रतन टाटा यांनी स्वत: सोशल मीडियावर एक निवेदन जारी करत यासंदर्भात खुलासा केला होता. ही बातमी अफवा असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटलं होतं. माझ्या वयामुळे आणि वैद्यकीय कारणांमुळे सध्या माझी वैद्यकीय तपासणी सुरु आहे, असेही त्यांनी सांगितलं होतं. मात्र, आज दुपारपासून त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालात दाखल करण्यात आले होते. मात्र रात्री उशीरा त्यांचे निधन झालं.
मुंबईत २८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबईत जन्मलेले रतन टाटा उद्योगांसह सामाजिक क्षेत्रातही काम करत आहेत. रतन टाटा हे टाटा समुहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पणतू आहेत. १९९० ते २०१२ पर्यंत २२ वर्षे ते टाटा समुहाचे अध्यक्ष होते. तसेच ऑक्टोबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ दरम्यान, त्यांनी टाटा समुहाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून कारभार पाहिला आहे. रतन टाटा यांनी अनेक वर्षे टाटा समुहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून कामकाज पाहिलं आहे.

एक यशस्वी उद्योगपती असण्याबरोबरच ते त्यांच्या परोपकार अन् दानधर्मासाठीही ओळखले जातात. रतन टाटा यांचा जन्म १९३७ मध्ये मुंबईत नवल टाटा आणि सुनी टाटा यांच्या पोटी झाला. रतन टाटा १० वर्षांचे असताना त्यांचे पालक विभक्त झाले, त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आजी नवाजबाई टाटा यांनी केले. रतन टाटा यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतून घेतले. यानंतर त्यांनी बिशप कॉटन स्कूल, शिमला आणि रिव्हरडेल कंट्री स्कूल, न्यूयॉर्कमधून १९५५ मध्ये डिप्लोमा केला. रतन टाटा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास त्यांनी कधीही लग्न केले नाही.
केवळ उद्योगच नव्हे तर रतन टाटा हे त्यांच्या परोपकारी कार्यासाठीही जगभर प्रसिद्ध आहेत. रतन टाटा यांनी भारतीय विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कॉर्नेल विद्यापीठाला एकूण २८ दशलक्ष डॉलर्स दान केले. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय भारतीय विद्यार्थ्यांना मदत होते. याबरोबरच हार्वर्ड बिझनेस स्कूलने विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ५० दशलक्ष डॉलर्स दान केले होते. याशिवाय त्यांनी २०१४ मध्ये IIT बॉम्बेमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी ९५ कोटी रुपयांची देणगी दिली होती. याबरोबरच दरवर्षी ते आपल्या कमाईतील मोठा हिस्सा धर्मादाय कार्यात खर्च करतात.