अकोला दिव्य ऑनलाईन : सिंचन क्षेत्राचा भविष्याचा वेध घेत, पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून करीत असलेल्या अभूतपूर्व कार्याची दखल घेऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सन्मानित रमेशचंद्र गट्टाणी यांचा या गौरवाबद्दल अकोला येथील माहेश्वरी समाज ट्रस्टतर्फे त्यांच्या निवासस्थानी जाऊन स्कार्फ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला.
बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ येथील रमेशचंद्र गट्टाणी यांनी मेहकर तालुक्यातील पैनगंगा नदीवर पेनटाकळी धरणाच्या उभारणीत सक्रिय सहभाग घेतला होता. एवढेच नव्हे तर धरणाची पायाभरणी करुन पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी त्यावेळी फेडरेशन ऑफ पेनटाकळी पाणी वापर सोसायटीची स्थापना करून, सर्वांना एक नवीन दिशा दिली. आज वयाच्या ७८ वर्षात देखील गट्टाणी तेवढ्याच क्षमतेने हे कार्य करीत आहेत. त्यांचा सिंचन क्षेत्रातील या अभूतपूर्व योगदानाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात एका शानदार सोहळ्यात हा गौरव करण्यात आला. अकोला येथील माहेश्वरी समाज ट्रस्टतर्फे त्यांच्या निवासस्थानी जाऊन स्कार्फ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला.

यावेळी माहेश्वरी समाजासाठी ही अभिमानाची बाब असून त्यांच्या कार्यामुळे समाजाला नवी ओळख मिळाली आहे, असे पनपालिया यांनी सांगितले. प्रा.रमण हेडा यांनी गट्टाणी यांनी केलेल्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. यावेळी अध्यक्ष विजय पनपालिया प्रधानमंत्री विजयकुमार राठी, सहाय्यक मंत्री विनीत बियाणी, ट्रस्टी मनीष लढ्ढा, प्रा.रमण हेडा, प्रा.महेश मुंदडा, नंदकिशोर बाहेती, सदगुरु परिवाराचे पुरुषोत्तम मालाणी उपस्थित होते.