Thursday, December 12, 2024
HomeUncategorizedकोण होईल आमदार ! अकोला पश्चिम मतदारसंघात मतदानाची अंतिम टक्केवारी 57.97 टक्के

कोण होईल आमदार ! अकोला पश्चिम मतदारसंघात मतदानाची अंतिम टक्केवारी 57.97 टक्के

अकोला दिव्य ऑनलाईन : पश्चिम विदर्भातील ‘ हाय व्होल्टेज सीट’ असलेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मतदानाची अंतिम टक्केवारी ५७.९७ टक्के असून गत निवडणुकीपेक्षा यावेळी मतदानात जवळपास ६ टक्के मतदान वाढलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात ५४ टक्के एवढे मतदान झाले होते. त्यानुसार केवळ मतदानात अवघे ३ टक्के वाढ झाली आहे. वाढलेल्या मतदानाची आकडेमोड करून ते कोणाच्या पारड्यात जाईल यासाठी आडाखे बांधले जात आहेत.अकोला जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदारसंघात गत वर्ष २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीपेक्षा मतदानात साडेसहा टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. पाचही मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याबद्दल जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी मतदार, राजकीय पक्ष, उमेदवार व निवडणुकीसाठी सहकार्य करणा-या विविध घटकांचे आभार मानले आहेत.

गेल्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी 57.80 एवढी होती. यात साडेसहा टक्क्यांहून अधिक वाढ होत यावर्षी अकोला जिल्ह्यात 64.76 टक्के मतदान झाले आहे. मतदानाच्या टक्केवारीत ही मोठी वाढ आहे. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात 5 लाख 59 हजार 757 पुरूष, 5 लाख 879 महिला आणि इतर 16 अशा एकूण 10 लाख 60 हजार 652 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. जिल्ह्याची एकूण मतदानाची टक्केवारी 64.76 आहे.

अकोट मतदारसंघात 68.35 टक्के मतदान झाले. यात 1 लाख 14 हजार 248 पुरुष आणि 98 हजार 442 महिला, अशा एकूण 2 लाख 12 हजार 690 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
बाळापूर मतदारसंघात 70.60 टक्के मतदान झाले. 1 लाख 16 हजार 212 पुरुष, 1 लाख 2 हजार 805 महिला आणि 1 इतर अशा एकूण 2 लाख 19 हजार 18 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. अकोला पश्चिम मतदारसंघात 57.97 टक्के मतदान झाले. यात 1 लाख 4 हजार 809 पुरुष, 98 हजार 531 महिला आणि 7 इतर अशा एकूण 2 लाख 3 हजार 347 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
अकोला पूर्व मतदारसंघात 61.60 टक्के मतदान झाले. यात 1 लाख 14 हजार 590 पुरुष, 1 लाख 4 हजार 218 महिला, इतर 3 अशा एकूण 2 लाख 18 हजार 811 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
मूर्तिजापूर मतदारसंघात 66.59 टक्के मतदान झाले. यात 1 लाख 9 हजार 898 पुरुष, 96 हजार 883 महिला, इतर 5 अशा एकूण 2 लाख 6 हजार 786 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.

मतदार जागृतीसाठी प्रशासनाचे सातत्यपूर्ण प्रयत्न, व्यापक जनजागृती ,‘स्वीप’ उपक्रमात राबवलेले अनेक अभिनव उपक्रम यामुळे मतदानात वाढ झाली. ज्येष्ठ, महिला, तरूण, नवमतदार आदींनी मतदान प्रक्रियेत उत्साहात सहभाग घेतल्याने जिल्ह्यातील मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली आहे. मतदानात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. निवडणूक प्रक्रियेत मतदार, राजकीय पक्ष, निवडणूक प्रक्रियेत सहभागी सर्व यंत्रणा, विविध संस्था, सर्व घटक यांनी सहकार्य केले. त्यामुळे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली, अशा शब्दांत जिल्हाधिकारी कुंभार यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.



.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!