अकोला दिव्य न्यूज : केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा बजेट सादर करुन एक नवीन उच्चांक गाठला असून यंदा सादर केलेला अर्थसंकल्प हा ऐतिहासिक ठरला आहे. देशातील लहान व मध्यम करदात्यांना आयकरात भरघोस सूट देऊन चांगलाच दिलासा दिला आहे. नवीन आयकर विधेयक पुढील आठवड्यात संसदेत सादर करण्यात येईल. त्यामधे सुटसुटीत व सरळीकरण करण्यात येईल. तर MSME ची मर्यादा 500 कोटींच्या टर्नओव्हर पर्यंत वाढविण्यासोबतच कस्टमड्युटी, एज्युकेशन आणि उडान सारख्या योजनेत लक्षणीय बदल करून उद्योग व व्यवसाय क्षेत्राला चालना दिली.अशी प्रतिक्रिया विदर्भातील ख्यातनाम रूहाटिया ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संचालक सिद्धार्थ शिवप्रकाश रुहाटिया यांनी दिली.

विदर्भ चेम्बर ऑफ कॉमर्स अँन्ड इंडस्ट्रीचे उपाध्यक्ष तसेच दक्षिण मध्य रेल्वेचे डीआरयूसीसी सदस्य असलेले सिद्धार्थ रुहाटिया आज अकोला दिव्य सोबत बजेटवर चर्चा करताना म्हणाले की सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून,अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात भविष्याचा वेध घेतला आहे.नोकरदार व सामान्य माणूसाच्या हाती पैसा राहिला पाहिजे म्हणून आयकरात १२ लाखांची सुट दिली. यामुळे नोकरदार मंडळींची क्रयशक्ती वाढणार आहे. उद्योजक आणि व्यावसायिकांकडून विविध कारणांमुळे विलंबाने आयकर रिटर्न दाखल करण्यात होणार विलंब आणि त्यामुळे येणारा मानसिक ताण कमी करण्यासाठी आयकर रिटर्न २ वर्षा ऐवजी ४ वर्षाचे दाखल करता येईल.
वस्तु विक्रीवर १ एप्रिल २०२५ पासून टी.सी.एस बिलामध्ये लावण्याची तरतूद रद्द करण्यात आली. टी.डी.एस ची मर्यादा वाढवून देण्यात आली. तसेच सतत मागील 2 वर्षात सकल प्राप्ती 5 कोटी रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या १२ ए अंतर्गत नोंदणीकृत धर्मादाय संस्थांना नुतनीकरण ५ वर्षाऐवजी १० वर्षांनी करावे लागेल. एकंदरीत वित्तमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे सकारात्मक परिणाम भविष्यात निश्चित दिसून येईल, असा विश्वास रुहाटिया यांनी व्यक्त केला.