अकोला दिव्य न्यूज : हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक आणि जवळपास ६ वर्षांपासून शिवसेनेचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणानुसार सदैव कार्यरत असलेले अर्थतज्ज्ञ आणि प्राध्यापक प्रकाश डवले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने तेली समाजाचा एक प्रमुख चेहरा उध्दव ठाकरे यांनी गमावला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. तर अलिकडच्या काळात पक्षांतर्गत सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून प्रा. डवले यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

शिवसेना उबाठाचे अकोला पश्चिम विधानसभा सहसंयोजक व तेली समाज नेते प्रा प्रकाश डवले यांनी सन २०१९ मध्ये शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला होता. तेली समाजाला पक्षात योग्य प्रतिनिधित्व नसल्यामुळे आपण राजीखुषीने हा राजीनामा देत असल्याचे प्रा डवले यांनी वार्ताहर बैठकीत सांगितले.
आपण पक्षासोबत एकनिष्ठ राहिलो असून आदित्य ठाकरे यांनी युवकांसाठी राज्यभर काढलेल्या “आदित्य संवाद” या कार्यक्रमात पंजाबराव कृषी विद्यापीठ येथे विशेष परिश्रम घेऊन शहरातील व जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना भेटी देत युवक युवतींना घेऊन मोठा कार्यक्रम यशस्वी केला होता.असेही डवले यांनी सांगितले.

पक्ष नेते आ नितीन देशमुख व जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या युवक-युवती मोर्चात सुध्दा मोठ्या प्रमाणात युवक-युवतींचा सहभाग होता. त्यासाठी आपण परिश्रम घेतल्याचे सांगितले. आपण तेली समाजाचे प्रतिनिधीत्व करत असून राज्य तेली समाज समन्वय समितीचा संस्थापक अध्यक्ष असतांनाही समाजाला पाहिजे त्या प्रमाणात लोकसभा आणि विधानसभेमध्ये प्रतिनिधीत्व दिले नसल्याचा आरोप प्रा डवले यांनी यावेळी केला. सबब आपण स्वेच्छेने पक्षातील सदस्य पदाचा राजीनामा देत असून नवे सामजिक परिवर्तन वेगळ्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाने एक सविस्तर पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पत्रकार परिषदेत सागर लोखंडे, पवन मेहसरे, किशोर स्वर्गे आणि वैभव फाटे उपस्थित होते.