अकोला दिव्य : गजानन सोमाणी एडिटर इन चीफ : प्रयागराज महाकुंभमध्ये आतापर्यंत अर्थात काल सोमवार १७ फेब्रुवारीपर्यंत ५४ कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान केले आहे. भाविकांची ही संख्या अंदाजापेक्षा जास्त असून दररोज सरासरी १ कोटींहून अधिक आहे, असे दस्तुरखुद्द अधिकाऱ्यांनीच सांगितल्याने, एक कोटी भाविकांचा सहभाग असताना मौनी अमावस्येच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीत अधिकृतपणे जाहीर केलेला ३० जणांचा मृत्यूचा आकडा शुध्द धुळफेक असल्याचे स्पष्ट होते आहे.

कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाल्याची ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वी १९५४ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर अलाहाबाद (आता प्रयागराज) येथे आयोजित केलेल्या पहिल्या कुंभमेळ्याला ४० लाखांहून अधिक यात्रेकरूंनी हजेरी लावली होती. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत शेकडो भाविकांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या ३५०-४०० होती. अंदाजानुसार ही संख्या ८०० पर्यंत पोहोचली. तत्कालीन सरकारने जाहीर केलेले आकडे आजही रेकॉर्डवर आहे. तर यंदा वर्ष २०२५ वर्षातील २६ जानेवारीपासून गेल्या २० दिवसांत सरासरी एक कोटींहून अधिक भाविक संगमात दररोज स्नान करत आहेत.असे वर्तमान सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार उघड झाले आहे. तेव्हा १९५४ मध्ये ४० लाखांचा संख्येतही ८०० भाविकांचा जीव गेला आणि २०२५ मध्ये तब्बल १ कोटींच्या गर्दीत मौनी अमावस्येला केवळ ३० जणांचा मृत्यू झाला ! तुमच्या तरी सद्सदविवेक बुध्दीला पटत का ? यावर कहर म्हणजे या दुर्दैवी घटनेत बळी गेलेल्या ३० भाविकांना मोक्षप्राप्ती झाली, असं पिठ्ठू असलेले साधूसंत म्हणाले. मनात खोलवर शल्य असं रुतून बसला आहे की, यावर लिहिण्यासाठी शब्द अपुरे पडतात. एवढं सगळं होऊनही दररोज भाविक कोटींचा संख्येने आहेत. असेच या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
आपल्या पूर्वजांनी कुंभमेळ्यासारख्या कार्यक्रमांची कधीही अशी जाहिरात केली नाही, पण आता आपण काय करत आहोत? आम्ही कुंभमेळ्याचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला आणि सर्वांना तिथे येण्याचे आमंत्रण दिले.यासोबतच या महाकुंभातून उत्तर प्रदेश सरकारला अब्जावधी रुपयांची कमाई होईल,असं देखील सरकारने स्पष्ट करताना भाविकांना आश्वासन देण्यात आले की, महाकुंभात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला तिथे सर्व सुविधा मिळतील. परंतु झाले काय तर भाविकांची फरफट झाली आणि शेवटी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.पूर्वजांनी असे कधीच केले नव्हते, उलट ते अशा परिस्थितींपासून लोकांना सावध करीत होते. तर आज या महाकुंभाचा चक्क व्यापार केला जातो आहे. तर आजची पिढी पिकनिक की पिकनिक म्हणून एन्जॉय करत असल्याचे दिसून येते आहे.

भारताच्या सांस्कृतिक वारशाचा खरा अर्थ काय ? तर ‘जेव्हा आपल्यापैकी काहींनी भारतीय संस्कृतीचा पुनर्शोध घेतला, तेव्हा प्राचीन विचारसरणीत, तत्वज्ञानात व इतिहासात आपला देश महान प्रगतीत होता.आपल्या प्राचीन वास्तुकला शिल्पकला, विचारधारा, तत्त्वज्ञान, विज्ञान, गणित, ज्योतिष आणि वैद्यकशास्त्रातील प्रगती अफाट होत्या. आपले पूर्वज साहित्य, नाटक, कविता, संगीत आणि नृत्य यांचे सौंदर्य पाहत होते. ते रानटी थाटमाट, धार्मिक विधी, पूजा आणि विविध सणांचे प्रदर्शन आणि त्याचे रंगीत उत्सव करत नव्हते. आज काय होते आहे ? तर बेमालूमपणे एक नवीन कट्टरपंथी जमात जन्माला घातली जात आहे.
राजकीय पक्षांच्या वादात धार्मिक संस्था ओढल्या जात आहेत, ज्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचते आहे. ब्रिटीश सरकारच्या काळातही साधू संघटनांनी सरकारशी निष्ठा असल्याचे ठराव मंजूर केले होते. माझे असे मत आहे की, या नव्या प्रथा धार्मिक संस्थांची प्रतिष्ठा कमी करतात आणि त्यांना वादग्रस्त पक्ष-राजकारणात खेचून आणतात. धर्माच्या नावाखाली अशा राजकीय हस्तक्षेपांना प्रोत्साहन देणे योग्य नाही. दरम्यान, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसार माध्यमांनी सोईस्कररित्या कान आणि डोळे मिटून घेतले आहे. काल परवा पर्यंत ‘सतीचं वाण’ म्हटले जाणारी पत्रकारिता आज ‘सत्तेचे वाहणं’ (चप्पल) झाले आहे. राधा सुता आता कुठं गेला पत्रकारिता धर्म !
आज धर्मनिष्ठतेबद्दल आणि अंधश्रद्धाबद्दलच्या दृष्टिकोनावर प्रश्न उपस्थित होतो आहे. कुंभमेळ्यादरम्यान झालेल्या दुर्दैवी घटनेवर संवेदना आणि मृतांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त केला.परंतु हे पुरेसे नाही. आपला पती धृतराष्ट्र आंधळा होता म्हणून पत्नी धर्म म्हणून गंधारीने देखील डोळ्यांवर पट्टी बांधून साथ दिली.पण शेवटी या तपाचे फळ काय मिळाले ? आज असंच काहीसं चित्र दिसतं असून भविष्यात अशा घटना टाळायच्या असतील तर आपण स्वतःला निर्दोष ठेवणे आवश्यक आहे. जर आपण निर्दोष नसलो तर आपण कुठे चुकलो हे शोधून काढावे लागेल. इतरांना दोष देऊन सत्य लपवून ठेवले गेले तर..तर आज सहन केलेल्या दुःखापेक्षा कितीतरी अधिक पटीने दुःख सहन करावं लागेल. कुंभमेळ्याच्या आयोजनातील बदलांवर आणि उच्चपदस्थ व्यक्तींच्या सहभागावर प्रश्न उपस्थित झाले आहे, ज्यामुळे भविष्यातील आयोजनांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली असून हा आकड्यांचा “खेळ” आणि धार्मिक ‘उन्माद’ आम्हाला रसातळाला घेऊन गेल्या शिवाय राहणार नाही, एवढं नक्की !…शुभम भवंतू