अकोला दिव्य न्यूज : मोहिनी मोडक : शेगांव येथील अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाने Industry Institute Meet IIM20 च आयोजन केलं होतं. प्रशस्त, सर्व सुविधायुक्त इमारती, अद्ययावत प्रयोगशाळा आणि कुशल प्राध्यापकवर्ग यामुळे या संस्थेनं चांगलं नाव कमावलं आहे. या आधीही काही ना काही निमित्ताने माझं या महाविद्यालयात जाणं झालंय परंतु यावेळेस ’मीट’च्या आयोजनाचा भाग म्हणून निमंत्रितांना शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानची ’अन्नपूर्णा अक्षयपात्र पाकशाळा’ बघण्याची संधी मिळाली. तिथे जायला एरवी परवानगी नसते.

महाविद्यालय असो की दवाखाना, मंदिर परिसर असो की भक्तनिवास, संस्थानच्या प्रत्येक प्रकल्पाप्रमाणेच ही पाकशाळा उत्कृष्ट असणार हे गृहीत धरलं होतं. संस्थानच्या सर्व प्रकल्पातले सदस्य, कर्मचारी, विद्यार्थी आणि दर्शनार्थी मिळून दररोज तब्बल पन्नास हजार लोकांसाठी नाश्ता आणि दिवसाचे तसेच रात्रीचे भोजन (महाप्रसाद) या एकाच पाकशाळेतून पुरवलं जातं. आधुनिक तंत्राच्या सहाय्याने सकाळी आणि संध्याकाळी केवळ २ तासात हे काम पूर्ण होतं.
SAP चा वापर करणारं माझ्या माहितीत तरी हे एकमेव धार्मिक संस्थान आहे. गुणवत्तेची आयएसओ प्रमाणपत्र कुठे टांगलेली दिसत नाहीत पण झाडा-निसर्गाच्या सान्निध्यातल्या या विविध महाकाय प्रकल्पातल्या कोणत्याही रस्त्यावर एका पानाचाही कचरा किंवा अव्यवस्था दिसत नाही. काटेकोरपणाचं उदाहरण द्यायचं तर पाकशाळेच्या आवारात तयार अन्नाचे कंटेनर घेऊन जाण्यासाठी गाड्या उभ्या केल्या जातात. या गाड्यांचे ऑईल वगैरे गळले तर परिसर खराब होऊ नये म्हणून प्रत्येक गाडीच्या इंजिनखाली ट्रे ठेवलेले होते. भव्य पाकशाळेत प्रवेश करताना बाहेर ठेवलेल्या सपाता घालणे अनिवार्य होते. केस झाकलेले, स्वच्छ गणवेशातले कर्मचारी आपापली कामे शिस्तबद्ध पद्धतीने करत होते. सेंट्रल पाईपलाईन मधून गॅसची नळी प्रत्येक पाक-यंत्राला जोडलेली होती.

आम्ही गेलो तेव्हा संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीच्या भोजनाची, पन्नास हजार माणसांच्या क्षुधाशांतीची तयारी सुरु होती. एकाच वेळी शिर्यासाठी रवा भाजला जात होता, जिलब्या पाकात पडत होत्या, मोठ्ठ्या फ्रीजच्या आकाराची इडलीपात्रं वाफाळत होती, तूप लावलेल्या शेकडो पोळ्या यंत्राद्वारे झपाझप तयार होत होत्या, प्रचंड आकाराच्या कुकरमध्ये भात शिजत होता, कढी, डाळभाजी मोठाल्या यांत्रिक कढयांमधून ढवळली जात होती. हे सगळं व्हिडीओ म्युट करावा तसं यंत्रांच्या ,माणसांच्या आवाजाविना सुरू होतं. या सगळ्य़ाला एका वेळी लागणारे मसाले, शिधा मोजून पाकीटांमधून त्या त्या पदार्थाच्या नावाच्या कप्प्यात रचलेले होते. त्यामुळे तिखट, मीठ कमी जास्त होण्याचा प्रश्नच नाही.

कायझनमधील ’प्लेस फॉर एव्हरीथिंग- एव्हरिथिंग इन प्लेस’ हे तत्त्व इथे अचूक वापरलं जातं. प्रसादाचे लाडू यंत्राद्वारे कागदात पॅक केले जात होते. तयार अन्न ठेवण्य़ासाठी लागणारे स्टीलचे मोठाले कंटेनर पूर्णपणे निर्जंतुक केले जात होते. संपूर्ण प्लांट मध्ये कुठेही तेलाचा डाग, खरकटे नावालाही नव्हते. कुठेही सांडलवंड नव्हती. तिथे तयार होणारे भोजन सेवणारी व्यक्ती कुणी का असेना, सर्वांना सारखं, उत्तम दर्जाचं, आरोग्यपूर्ण अन्न मिळालं पाहिजे याकडे व्यवस्थेचा कटाक्ष आहे.
यंत्रांद्वारे मोठ्या प्रमाणावर वेगवान उत्पादन, काही पाकक्रियांसाठी ऑटोमेशनचा वापर, तयार अन्नाची डीजिटल फूड लॅबद्वारे तपासणी असे इंडस्ट्री २.०, इंडस्ट्री ३.० आणि काही प्रमाणात ४.० तिथे पाहायला मिळालं. माणूस आणि यंत्रांचा सतत संबंध येत असल्याने कर्मचार्यांच्या सुरक्षिततेची आणि साधनसामग्रीचा अपव्यय होणार नाही याची किती काळजी घेतली जाते हे ही बघता आलं.
भाज्या धुणे, बटाटे सोलणे यासारख्या कामांसाठी यंत्रांचा वापर होत असला तरी भाज्यांमध्ये अळ्या/कीड असू शकते हे लक्षात घेऊन त्या चिरण्यासाठी मात्र महिला कर्मचारी होत्या. भजनं गुणगुणत त्यांची कामं सुरु होती. स्वच्छ केलेल्या भाज्या हारीने लावून ठेवलेल्या होत्या. हा विभाग मुख्य पाकशाळेपासून वेगळा होता. “अन्नं ब्रह्मेति व्यजानात्” अर्थात अन्न हेच ब्रह्म आहे या भावनेतून पाकशाळेचं संपूर्ण काम सुरु आहे.
तळघरांमध्ये सोन्याचांदीच्या राशी रचण्याऐवजी लोकांचा (देणगीचा) पैसा पूर्णपणे लोकांसाठी वापरला जावा हा संस्थानचा उद्देश आहे. त्यातूनच संस्थान वेगवेगळे समाजोपयोगी प्रकल्प पारदर्शक पद्धतीने चालवतं. ’योजक: तत्र दुर्लभ’ परंतु इथे मात्र तसं नाही. प्रकल्पातल्या प्रत्येक कामाच्या नियोजनाला वेळ लागला तरी चालेल पण एकदा का ते कृतीत आलं की ते परिपूर्ण असावं याबाबत व्यवस्थापन आग्रही असल्याचं सोबतच्या प्राध्यापकांनी आवर्जून सांगितलं. खरं तर याहून अत्याधुनिक आणि महाकाय स्तरावरच्या फूड प्रोसेसिंगच्या चित्रफीती आपण नेहमी पाहतो तरीही हे वेगळं आहे. कोणताही व्यावसायिक हेतू नसूनही अतिशय व्यावसायिक पद्धतीने, प्रसिद्धीपासून दूर, निस्वार्थ भावनेने, एका लहानशा गावात इतक्या मोठ्या स्केलवर केलं जाणारं हे काम व्यवस्थापन कौशल्याचा वस्तुपाठ ठरावं.
श्री गजानन महाराज संस्थानचा एकूणच ‘कर्मयोगी’,सचोटीचा, सर्वार्थाने स्वच्छ व मूल्याधिष्ठित कारभार पाहिला तर माणसातल्या देवत्वाची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. आपण चकित होऊन कुठे रेंगाळलो की तिथले सेवक विनम्रतेने आपल्याला ‘चला पुढे माऊली’ म्हणतात. खरं तर हे आवाहन नसून जादुई मंत्र आहे.
दर्शनासाठी वेगवेगळ्या किंमतीच्या रांगा, देवस्थानातली अस्वच्छता, व्यवस्थापनातली अनागोंदी किंवा एकूणच अध्यात्माचा बाजार पाहून व्यथित झालेलं मन असे नंदादीप आजही शांतपणे व निरलसतेने अव्याहत तेवत आहेत हे पाहून खरोखर निवतं
© मोहिनी मोडक अकोला