अकोला दिव्य न्यूज : पोलीस प्रशासनातील काही अधिकारी विविध माध्यमांतून स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात व्यस्त असताना उपराजधानीतील हत्यांची प्रकरणे मात्र त्यांना आरसा दाखवत आहेत. केवळ दीड तासाच्या अंतरात नागपुरात दोन हत्या झाल्या. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकतर्फी प्रेमातून गुंडाने लग्नात जाऊन राडा घातला व मध्यस्थी करणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या केली. तर एमपीडीएतून सुटून बाहेर आलेल्या वर्ध्यातील कुख्यात गुंडाचा इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेम झाला. या दोन्ही घटनामुळे शहरातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणेच्या कार्यप्रणालीबाबत विविध प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

भिलगाव येथील एका हॉलमध्ये आयोजित लग्न समारंभात आरोपी बिरजू दिपक वाढवे (३०), लखन वाढवे (२८) व ईप्पू उईके या तीन आरोपींनी लग्नात राडा घातला व मध्यस्थी करणारा वधूच्या भावाचा मित्र विहंग मनीष रंगारी (२३, टेकानाका) याची हत्या केली. मृतक हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता. या हत्येचा सूत्रधार दीपक वाधवे हा एक कुख्यात गुन्हेगार आहे. त्याची वधूशी जुनी ओळख होती. एकतर्फी प्रेमातून तो तिला त्रास द्यायचा. आरोपीने २०१८ काल्या गजभियेची हत्या केली होती. या प्रकरणात, तो २०२१ मध्ये तुरुंगातून जामिनावर बाहेर आला. २०२३ मध्ये त्याच्याविरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

तो कुख्यात गुंड असल्याने वधूच्या कुटुंबियांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. लग्न ठरल्याचे कळताच, वधू-वरांच्या घरी हळदीचा समारंभ येऊन बिरजूने गोंधळ उडवला होता. वराच्या बाजूच्या एका पाहुण्याशीही त्याचा वाद झाला. बिरजूने निर्माण केलेल्या दहशतीमुळे कोणीही पोलिसांकडे तक्रार केली नाही. रात्री भिलगावमध्ये लग्न समारंभ रात्री ११ वाजता, बिरजू त्याचा भाऊ लखन, इप्पू उईके आणि इतर मित्रांसह कार्यक्रमात आला. तेथे शिवीगाळ करून आरोपी गोंधळ घालू लागले. हे पाहून एका पाहुण्याने यशोधरानगर पोलीस ठाण्यातील एका ओळखीच्या पोलिस कर्मचाऱ्याला माहिती दिली. बीट मार्शल घटनास्थळी पोहोचले. पोलिस कर्मचारी लग्न समारंभात पोहोचताच आरोपी पळून गेले. लग्न समारंभात व्यत्यय येण्याच्या भीतीमुळे वधू पक्ष आणि इतर लोक तक्रार दाखल करण्याच्या बाजूने नव्हते. पोलिस परत जाताच आरोपी परत तिथे पोहोचले व गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मृतक विहंगने महिलांसमोर शिवीगाळ का करत आहात असे म्हटले असता आरोपींनी त्याला पकडले व त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. सोबतच सिमेंटच्या गट्टूने त्याच्या डोक्यावर प्रहार केले. यात विहांगचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी फरार झाले. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दारूच्या नशेत वाद, गुंडाची हत्या
दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास एमपीडीए अंतर्गत तुरुंगातून सुटलेला वर्धा येथील कुख्यात गुन्हेगार सोनू उर्फ दीपक विजय वासनिक (४४) याची इमामवाडा येथील गुन्हेगारांनी हत्या केली. दीपक ३५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो वर्ध्यातील कुख्यात गुंड आहे. रामबागमधील कुख्यात गुन्हेगार तसेच आरोपी आकाश प्रफुल्ल मेश्राम व दीपक यांची ओळखी होती. दीपकला वर्धा पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत नागपूर कारागृहात रवानगी केली होती. गुरुवारी त्याला तुरुंगातून सोडण्यात आले. तो आकाशला भेटण्यासाठी इमामवाड्यात पोहोचला. तिथून आकाश त्याचा मित्र सोनू रामटेके आणि दत्तू पासेरकर यांच्यासोबत दीपक मोमिनपुरा येथे गेला. तिथे जेवण केल्यानंतर, सर्वजण वस्तीत परतले. रात्री १२.३० वाजता दहिकर झेडा चौकात सर्वजण दारू पीत बसले होते. यावेळी त्यांच्यात जुन्या वादावरून वाद झाला. दीपकने आरोपींना शिवीगाळ करायला सुरुवात केली. आरोपींनी त्याच्या डोक्यावर दगडाने प्रहार करत त्याची हत्या केली. कमलाबाई दयाराम पाटनकर (६५) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत आकाश व सोनू यांना अटक केली.