अकोला दिव्य न्यूज : Congress Harshvardhan Sapkal News: आत्ताच्या सत्ताधारी भाजपाने नैतिकतेला हरताळ फासला आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना फसवणूक प्रकरणी न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा होता किंवा सरकारने त्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता पण तसे झाले नाही. आता महामहिम राज्यपाल यांनीच याप्रकरणात लक्ष घालून माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा व त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मानहानीच्या एका बोगस प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठवली असता सचिवालयाने अर्ध्या रात्रीच त्यांची खासदारकी रद्द केली, त्यानंतर त्यांचे शासकीय घरही सोडण्यास भाग पाडले तसेच काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनिल केदार यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावताच त्यांची आमदारकी तात्काळ रद्द करण्यात आली पण माणिकराव कोकाटे यांच्याबाबतीत वेगळा न्याय आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी वेगळा न्याय कसा, असा प्रश्न विचारून कोकाटे प्रकरणात सरकार लोकशाही पद्धतीने वागत नाही, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
शिवरायांचे मावळे आणि संघ स्वयंसेवकांची तुलनाच होऊ शकत नाही
गोविंदगिरी महाराजांच्या विधानावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि संघ स्वयंसेवक यांची तुलनाच होऊ शकत नाही. हा महाराजांचा आणि मावळ्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषकेला विरोध करणारा विचार हा संघाच्या विचाराशी मिळता जुळता आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याबद्दल अफवा पसरवण्याचे काम सातत्याने करत आहेत. मावळ्यांचा विषय जातीच्या पलीकडचा आहे, ते कोणत्या जाती धर्माचे नव्हते तर स्वराज्याच्यासाठी लढणारे छत्रपतींचे सैन्य होते. हेच गोविंदगिरी देवेंद्र फडणवीस यांना छत्रपती शिवाजी महाराजांना जिरेटोप घालून त्यांना महाराज बनवण्याचा प्रयत्न करत होते. जिरेटोप हे शिवाजी महाराजांचे प्रतिक आहे ते आरएसएस बळकावू पाहत आहे, या शब्दांत सपकाळ यांनी हल्लाबोल केला.

दरम्यान, महाकुंभमेळा हा राजकारणाचा आखाडा नाही, त्यामुळे यावर राजकारण नको, हीच काँग्रेसची भूमिका आहे. महाकुंभमेळा हा काही पहिल्यांदाच होत नाही, याआधाही कुंभमेळे झाले आणि पंतप्रधान व राष्ट्रपती यांनीही त्यात सहभाग घेतलेला आहे. यावेळी मात्र मोदी-योगी यांनी महाकुंभमेळ्याला राजकीय स्वरुप दिले आहे. भाविकांसाठी व्यवस्था दिसून आली नाही, चेंगराचेंगरीत भाविकांचे मृत्यू झाले. चांगली व्यवस्था केली असती तर आणखी लोकांना महाकुंभमेळ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली असती, असे सपकाळ यांनी सांगितले.