अकोला दिव्य न्यूज : सहकारातच समृध्दीचा पाया असून, शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता यायला पाहीजे, म्हणून १०० वर्षापूर्वी आपल्या पुर्वजांनी सहकाराची निर्मिती करून शेतीला गती देण्याचे काम केले. आता सहकारामध्ये केंद्र व राज्य सरकारची देखील रूची बाढली असून, सहकाराला नवा आयाम देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सहकाराचा आत्मा असलेल्या सेवा सहकारी सोसायट्यांच्या बळकटीकरणासाठी नवे धोरण आखले असून, याअंतर्गत अनुदानरूपी साहीत्य देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. सेवा सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून शेतीच नव्हे तर जोड उद्योगाला चालना देत आपल्यात आर्थिक सुबत्ता आणता येईल असे प्रतिपादन दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे यांनी केले.

आंतरराष्ट्रीय सहकार बर्षानिमित्त सेवा सहकारी सोसायट्यांच्या बळकटीकरणाच्या दिशेने राबवित असलेल्या उपक्रमांतर्गत सेवा सहकारी सोसायटी जवळा, डाबकी, दुघलम येथे ते बोलत होते. यावेळी दुधलम येथील सेवा सहकारी सोसायटीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन डॉ. कोरपे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महल्ले, जवळा सोसायटीचे अध्यक्ष गजाननराव गावंडे, डाबकी सोसायटीचे अध्यक्ष प्रल्हादराव पडोळे, उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, तसेच निळकंठराव खेडकर, प्रभाकरराव राऊत मंचावर उपस्थीत होते.
डॉ. कोरपे पुढे म्हणाले, सर्वांच्या सहकार्यातून साधलेला विकास निरंतर आणि तेवढाच परिपक्क असतो ही बाब आपल्या पुर्वजांनी हेरून सहकार वृत्ती जोपासली. त्यातुनच शेतीचा विकास साधत आले. यामध्ये सेवा सहकारी सोसायट्या हा महत्वाचा दुवा असून त्याचे बळकटीकरण करण्याची गरज आहे. केंद्र सरकारने देखील यासाठी नवेधोरण अंमलात आणले असून रु. ३.०० लाख किंमतीचे संगणक अनुदानावर देण्यात आले आहे. ही मोठी उपलब्धी असून, याव्दारे सोसायट्यातील कामकाजात सुसुत्रता येईल.

अनेक सोसायट्यांकडे आपली स्वतःची इमारत नाही तथापी आता नवीन इमारतीसाठी अल्पदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे तर जिल्हा बँकेकडून रू.१.०० लाख अनुदान देण्यात येत असून काही सोसायट्यांनी लाभ देखील घेतला आहे. याशिवाय शास्वत शेती उत्पादन बाढी करीता बँकेने अत्यल्प व्याजदरात जलसिंचन कर्ज उपलब्ध करून दिले आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे डॉ. कोरपे म्हणाले,
सहकारातून समृध्दी आणण्यासाठी युवकांनी पुढे यावे सोसायट्यांच्या इमारती उभ्या करून तेथे केवळ शेतीच नव्हे तर अन्य जोडउद्योग सुरू केल्यास विकासाला चालना मिळेल. ह्यातुन गावाचा पर्यायाने जिल्ह्याचा विकास साधता येईल, यासाठी विलंब होवू शकतो परंतु अशक्य नाही.पुढील २ ते ३ वर्षात सोसायट्याव्दारे विकासाचे मुर्तरूप साकारले जाईल असा विश्वासही डॉ कोरपे यांनी व्यक्त केला.
अकोला-वाशिम जिल्ह्याच्या सहकाराला शतकोत्तर परंपरा आहे. आपल्या पूर्वजांनी परस्पर विश्वासावर सहकार अंगिकृत करत त्याला बळ देण्याचे काम केले, सेवा सहकारी सोसायटी हा सहकारातील मुख्य घटक समजून त्यांना सक्षम करण्याचे तसेच शेतीला जोड व्यबसाय व इतर व्यवसाय उभारून भरीव कार्य करण्याची गरज आहे. हा विश्वास पुर्वजापासून आजच्या नवयुवकापर्यंत चालत आला असून तो अधिक दृढ झाला पाहिजे. त्यास अनुसरूनच सेवा सोसायट्यांना बळकटी देवून सामुहीक विकास साधण्याचा आपला संकल्प असल्याचे प्रतिपादन बँकेचे नवनिर्वाचीत संचालक डॉ जयराज कोरपे यांनी केले.
कार्यक्रमास सेवा सहकारी सोसायटबांचे आजी माजी पदाधिकारी, सदस्य व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.