अकोला दिव्य न्यूज : अकोला महापालिकेच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा दडपण्यासाठी निलम गोऱ्हेंनी २५ लाखांची मागणी केल्याचा दावा आमदार नितीन देशमुखांनी केला आहे. भ्रष्टाचारासंदर्भात एखादी लक्षवेधी लागली तर त्यासाठी २५ लाखांची मागणी व्हायची. त्याचं उदाहरण मला माहीत आहे, असं आ.देशमुख यांनी सांगितले . ज्यावेळी अकोला महापालिकेतील भ्रष्टाचारासंदर्भात तत्कालीन विधान परिषदेतील अकोल्याच्या आमदारांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी त्यांनी अकोला महापालिकेसंदर्भात बैठक देखील बोलावली होती, त्यावेळी नीलमताई यांनी स्वत: मला म्हणाल्या होत्या की, या प्रकरणात आपण विरोधी लोकांना सहकार्य करु. विधान परिषदेच्या आमदारानं अकोला महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचे पुराव्यानिशी प्रश्न मांडला.तो भ्रष्टाचार दडपण्यासाठी त्यावेळी २५ लाखांची मागणी मला करण्यास गोऱ्हेंनी सांगितले होते. पण मी त्यांना नकार दिला. मी असं कृत्य करु शकत नाही. पण नीलम ताईंनी अकोला महापालिकेतील भ्रष्टाचार दडपण्यासाठी २५ लाखांची मागणी केली होती ही बाब खरी आहे, असं देशमुखांनी म्हटलं.

पुण्यातील ठाकरे सेनेचे नेते वसंत मोरेंनीदेखील लक्षवेधीवरुन गोऱ्हेंना लक्ष्य केलं आहे. नीलम गोऱ्हे पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विधान परिषदेत ‘लक्षवेधी’ मांडण्याच्या धमक्या देऊन पैसे उकळत होत्या, असा आरोप वसंत मोरेंनी केला आहे. तर महापालिका अधिकाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्या तुम्ही उद्धव साहेबांना मर्सिडीज काय देणार? असा सवाल मोरेंनी नीलम गोऱ्हे यांना विचारला आहे.
मोरें यांचा ‘लक्षवेधी’ आरोप, शिवसैनिकांनी तोंड उघडलं तर…
२०१२ पासून ते २०१७ पर्यंत शिवसेना नेत्यानं तोंड उघडले तर ताई तुम्ही कुठे असाल? असा थेट इशारा सुद्धा वसंत मोरे यांनी दिला आहे. त्यामुळे गोरे यांच्या वक्तव्यानं पेटलेला हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

ठाकरेसेनेत पदासाठी २ मर्सिडीज द्यावा लागत असल्याचा खळबळजनक दावा शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्या नीलम गोऱ्हेंनी केला. त्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. ठाकरेसेनेतील अनेक नेत्यांनी नीलम गोऱ्हेंना लक्ष्य केलं आहे. खासदार संजय राऊत, नेते वसंत मोरेंनी गोऱ्हेंवर टीकास्त्र सोडलं आहे. यानंतर आता आमदार नितीन देशमुख यांनीही गोऱ्हेंवर गंभीर आरोप केले आहेत.