गजानन सोमाणी: एडिटर इन चीफ : पुरोगामी महाराष्ट्राचा सुसंस्कृत आणि सुधारणावादी राजकारणाचे अलिकडच्या काही वर्षांतच पुरतं मातेर झाले आहे. देशाला दिशादर्शक असलेले महाराष्ट्रातील राजकारण दिशा शून्य झाले असून, कमरेवरच सोडून डोक्यावर बांधण्याची, नेत्यांमध्ये जणू स्पर्धाच लागली आहे की काय हे बघणं आणि ऐकून घेणे आता किळसवाणं झाले आहे.काल-परवा पर्यंत रयतेच असलेलं राज्य आता ‘रामराज्य’ होईल, या अपेक्षेने सत्ताबदल तर केला खरा. पण रामराज्य येईल तेव्हा येईल मात्र राजकारणाची दिशा आणि दशा पाहून आजच्या व्यवहारवादाला आदर्श मानणाऱ्या राजकारण्यांनी ‘ती’ नैतिकता पार विकून खाल्लेली दिसते. दरदिवशी कोणी ना कोणीतरी या अनैतिकत झालेल्या क्षेत्राचा शिरोमणी होऊ पाहत असताना आता नीलम गोऱ्हे देखील शिरोमणी होऊ पाहतात की काय?

सुसंस्कृतपणा दुसऱ्यावर टीका करण्याचा अधिकार नैतिकतेतून मिळत असतो. ती करण्याआधी आपण स्वत: किती स्वच्छ हे तपासून बघण्याची सवय अंगी बाणावी लागते. ही आत्मपरीक्षणाची सवय आता राजकारणातून जवळपास हद्दपार झाली असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीत पार पडलेल्या साहित्य संमेलनात केलेल्या ताजे वक्तव्य या शंकेला बळ देते. कुणा एकेकाळी स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेत रामदास आठवले, प्रकाश आंबेडकरांच्या साथीने समाजकारण व राजकारण करणाऱ्या गोऱ्हेंना नंतर हिंदुत्ववादी असल्याचा साक्षात्कार झाला व त्या शिवसेनेत गेल्या. तिथे दीर्घकाळ सत्ता भोगल्यावर ती टिकवण्यासाठी त्या शिंदेंच्या म्हणजे ‘अधिकृत’ सेनेत प्रवेश करत्या झाल्या. इतक्या वैचारिक कोलांटउड्यांनंतर निदान शांत बसावे व वाट्याला आलेल्या पदाचा सुखेनैव उपभोग घ्यावा तर तसेही नाही. आता त्यांना आणखी प्रखर हिंदुत्ववादी होण्याचे वेध लागलेले दिसतात.
संमेलनाच्या व्यासपीठावरून त्यांनी केलेले राजकीय वक्तव्य हेच दर्शवते. ठाकरेंच्या शिवसेनेत पद मिळवण्यासाठी दोन मर्सिडिज द्याव्या लागतात असे म्हणणाऱ्या गोऱ्हेंनी प्रत्येक वेळी विधान परिषद मिळवण्यासाठी आजवर किती गाड्या दिल्या, असा प्रतिप्रश्न कुणी करू शकेल याचेही भान राहिले नाही. याच गोऱ्हेंनी खूप वर्षांआधी पुरोगामीपणाशी घटस्फोट घेत सेनेचा गंडादोरा बांधताना ५१ हजारांची देणगी दिली होती म्हणे ! तेव्हा एवढ्या किमतीत मर्सिडिजचे टायरही मिळायचे नाहीत हे त्यांना कोण सांगणार? मुळात साहित्याच्या मंचावरून अशी राजकीय मळमळ ओकायची काहीच गरज नव्हती. तरीही त्या बोलल्या याचे कारण, आहे ते पद टिकवण्यात म्हणजे सत्तालोलुपतेत दडलेले आहे.

फार वर्षांपूर्वी काम करून निष्ठा सिद्ध केली जात असे. आता विरोधकांवर टीका करून ती केली जाते. वैचारिक व्यभिचाराला सरावलेल्या राजकारण्यांचे गुण गोऱ्हेंनी फारच जलदगतीने आत्मसात केले असे खेदाने का होईना पण म्हणावे लागते. सभागृहातील आहे त्यापेक्षा वरिष्ठ पदाने ऐनवेळी हुलकावणी दिल्यामुळे झालेल्या हिरमोडातून अजून त्या बाहेर आलेल्या दिसत नाहीत. त्यासाठी आणखी काय काय करावे लागेल या विचाराच्या नादात त्यांनी ही आगळीक केली असावी. ती त्यांच्या अंगलट येण्याचीच शक्यता जास्त. कारण आता ठाकरेंच्या सेनेचे अनेक लोक गोऱ्हेंनी काय काय मागितले हे उघडपणे बोलू लागले आहेत. संवैधानिक पदावरील व्यक्तीने स्वत:वरच अशी चिखल उडवून घेण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, ही राज्याची अधोगती असून याला ९०० सौ चुहे खा कर बिल्ली…..चली, नाही तर आणखी काय म्हणायचे ?