अमरावतीत व्यावसायिकाला मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी ! गुन्हा दाखल

    0
    910

    अकोला दिव्य न्युज ब्युरो : पाच लाख रुपये दे; अन्यथा तुझ्या मुलीचे माझ्यासोबतचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल, अशी धमकी देत एका व्यावसायिकाकडे खंडणी मागण्यात आली. तसेच ते फोटो व्यावसायिकाच्या पुतण्याच्या सोशल मीडियावरील आयडीवर पाठविण्यात आले. या प्रकरणी कोतवाली ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अध्ययन चव्हाण रा. कानपूर, उत्तरप्रदेश असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कोतवाली ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या व्यावसायिकाच्या मुलीची आणि आरोपीची सोशल मीडियावर ओळख झाली होती. मात्र, त्यानंतर अध्ययन तिला त्रास देऊ लागला. त्यामुळे तिच्या व्यावसायिक वडिलांनी १५ डिसेंबर २०२३ रोजी अध्ययनशी मोबाइलद्वारे संपर्क साधला. त्यावर तुमच्या महिला नातेवाइकाचे आणि माझे खासगी फोटो माझ्याकडे आहेत. ते फोटो व्हायरल होऊ द्यायचे नसतील, तर दहा दिवसांत ५ लाख रुपये देण्याची मागणी त्याने केली. न दिल्यास ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. त्याला समजविण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने त्यांना शिवीगाळ केली.

    अध्ययन समजण्याच्या मानसिकतेत नसल्याने मला तुझ्या आईशी बोलायचे आहे, असे व्यावसायिकाने म्हटले. त्यावर अध्ययनने एका महिलेजवळ आई म्हणून मोबाईल दिला. तुमचा मुलगा अत्यंत चुकीचे वागत आहे, त्याला समजून सांगा, अशी विनंती त्यांनी केली. त्यावर त्या महिलेनेदेखील मेरा बेटा जैसे बोल रहा है, उतने पैसे लाकर दे दो, फिर मै उसको बोलती हू. नही तो वह फोटो व्हायरल कर देगा, अशी धमकी त्या महिलेने दिली.

    मोबाइलवर बोलत असतानाच अध्ययनने व्यावसायिकाच्या पुतण्याच्या सोशल मीडियावरील आयडीवर त्यांच्या मुलीचे त्याच्यासोबत असलेले काही अश्लील फोटो पाठविले. आता तर ते फोटो केवळ तुझ्या नातेवाइकाच्या आयडीवर पाठविले. पाच लाख रुपये न दिल्यास ते सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर अध्ययनने व्यावसायिक आणि त्यांच्या मुलीला वारंवार कॉल करून धमक्या दिल्या. अध्ययननचा त्रास वाढत चालल्याने व्यावसायिकाने अखेर कोतवाली ठाण्यात तक्रार दाखल केली.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!