अकोला दिव्य न्यूज : अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफबाबत आणखी एक यू-टर्न घेतला आहे. ट्रम्प प्रशासनाने ऑटोमोबाईल क्षेत्रावरील आयात शुल्काचा (टॅरिफ) परिणाम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे देशांतर्गत कार उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

याअंतर्गत, परदेशी सुटे भागांवरील शुल्क कमी केले जाईल आणि आयात केलेल्या गाड्यांवर एकाच वेळी अनेक शुल्क लादले जाणार नाहीत. वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक म्हणाले की, हे पाऊल ‘अमेरिकन उद्योग आणि कामगारांसाठी एक मोठा विजय आहे.

ऑटो टॅरिफवर ट्रम्पचा घूमजाव
याआधी ट्रम्प यांनी 3 मे पर्यंत ऑटो पार्ट्सवर 25% आयात शुल्क आकारण्याची घोषणा केली होती पण, उद्योजकांच्या विरोधानंतर आता नवीन नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, ट्रम्प म्हणतात की ‘अमेरिकन नोकऱ्या वाचवण्यासाठी आणि परदेशी कंपन्यांवर दबाव आणण्यासाठी’ हे पाऊल आवश्यक आहे.
रॉयटर्सच्या नुकत्याच दिलेल्या वृत्तानुसार, नवीन योजनेअंतर्गत देशांतर्गत कार उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या परदेशी भागांवरील शुल्क कमी केले जाईल.

आयात केलेल्या गाड्यांच्या किमती वाढू नयेत म्हणून त्यांच्यावर एकापेक्षा जास्त शुल्क आकारले जाणार नाही. लॅटनिकच्या मते, या धोरणाचा फायदा त्या कंपन्यांना होईल ज्या अमेरिकेत गुंतवणूक आणि उत्पादन वाढवतील. द वॉल स्ट्रीट जर्नलने सर्वप्रथम ही बातमी दिली होती. ट्रम्पच्या मिशिगन भेटीआधी दिलासा अपेक्षित होता, कारण मिशिगन डेट्रॉईटच्या मोठ्या ऑटो कंपन्यांचा आणि 1,000 हून अधिक पुरवठादारांचा बालेकिल्ला आहे.

ट्रम्पच्या टॅरिफ योजनेला उद्योजकांचा विरोध
गेल्या आठवड्यात जीएम, टोयोटा, फोक्सवॅगन आणि ह्युंदाईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कंपन्यांनी ट्रम्प यांना एक चेतावणी पत्र पाठवले. त्यांनी सांगितले की, 25% कर लादल्याने कारच्या किमती वाढतील आणि विक्री कमी होईल. तसेच यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होतील, ज्यामुळे उत्पादन थांबेल आणि लहान पुरवठादार दिवाळखोरीत जातील परिणामी बेरोजगारी वाढेल.
अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी, ट्रेझरी सेक्रेटरी आणि वाणिज्य सेक्रेटरी यांना हे पत्र पाठवण्यात आले. कंपन्यांनी आग्रह धरला की टॅरिफ लागू करण्यापूर्वी उद्योगाला वेळ हवा.

अमेरिकेचा 90 दिवसांसाठी परस्पर शुल्काला विराम
चीन वगळता अमेरिकेने इतर देशांवरील परस्पर आयात शुल्क आकारणीचा निर्णय 90 दिवसांसाठी पुढे ढकलला असून भारतातील ऑटो कंपोनंट निर्यातीच्या सुमारे 65 टक्के भाग नवीन टॅरिफमुळे प्रभावित होण्याचा अंदाज आहे. परस्पर शुल्क म्हणजे रेसिप्रोकल टॅरिफवर काही दिवसांचा विराम दिल्यानंतर आता 10 टक्के शुल्क आकारले जात आहे.
