अकोला दिव्य न्यूज : सुट्ट्या लागल्या की लहान मुलांना अनेक गोष्टीचे वेध लागतात. लहान मुले सतत कोणाला कोणाची नक्कल करत त्यांच्या कल्पना विश्वात वावरत असतात पण जशी जशी ती मोठी होतात ह्या सर्व गोष्टी त्यांच्या मनातच दडून राहतात. परंतु ह्या सर्व बाबी मनातच न राहता कुठेतरी व्यक्त होण्यासाठी त्यांना गरज आहे, अशा एखाद्या जागेची तिथे त्यांना मनसोक्त खेळता येईल बागडता येईल आणि त्यांच्या मनातील संकल्पना पुढे मांडता येतील म्हणूनच आर.डी.जी इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म टेलिव्हिजन अण्ड ड्रामॅटिक आणि सिद्धी गणेश प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने 9 दिवसीय नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

रंगभूमीचे जतन व संवर्धन करून नवीन कलाकार तयार व्हावेत या हेतूने भारतीय सेवा सदनचे संचालक दिलीपराज गोयनका यांच्या संकल्पनेतून आणि आर डी जी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.चारुशीला रुमाले यांच्या मार्गदर्शनात सिद्धी गणेश प्रोडक्शनचे संचालक सचिन गिरी यांच्या नियोजनाखाली या बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

नाट्य प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना नाटकाच्या तंत्राचा अभ्यास व्हावा, योग्य मार्गदर्शन मिळावे, त्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा व त्यांना योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी हे नाट्य प्रशिक्षण शिबिर दिनांक 20 एप्रिल ते 28 एप्रिल २०२५ या 9 दिवसांच्या कालावधीत संपन्न झाले असून वय वर्षे 7 ते 14 या वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

प्रशिक्षणामध्ये विनामूल्य प्रवेश देण्यात आला होता. शिबिराचे उद्घाटन 20 एप्रिल रोजी करण्यात आले. बालनाट्य प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शक म्हणून नाट्य क्षेत्रातील बाल नाट्यसाठी महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध असे देवदत्त पाठक आणि त्यांचे सहकारी मिलिंद केळकर तसेच मागील कित्येक वर्षापासून अकोल्यात बालनाट्य शिबिरासाठी सर्वांना माहिती असलेले नाव म्हणजेच डॉ. सुनील गजरे, ज्येष्ठ नाट्यकर्मी विष्णू निंबाळकर आणि बरेच ज्येष्ठ नाट्य कलावंत, तंत्रज्ञ, लेखक हे मार्गदर्शक म्हणून होते.

शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अनेक नाट्यछटा स्वागत आणि स्किट सादर केल्या. गणपती बाप्पा मोरया, सुंदर गाव,स्वच्छ गाव,आदर्श वाढदिवस ,स्त्री शक्ती,गणेश विसर्जन,लग्न पहावं करून ,मला अभ्यास करू द्या…., गुरु शिष्य परंपरा….,वो बुलाती है मगर जाने का नही, पुतळा…. अशी सादरीकरण करण्यात आली.

प्रशिक्षण संपल्यानंतर प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आलेत. समारोपिय कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भारतीय सेवा सदनचे अध्यक्ष दिलीपराज गोयनका, डॉ.सुनील गजरे, विष्णू निंबाळकर व प्राचार्य डॉ. चारुशीला रुमाले उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सिद्धी गणेश प्रोडक्शनचे संचालक सचिन गिरी, गीता जोशी, विष्णू शिरसागर, महेश इंगळे, रोशन समदुरे, प्रमोद वानखडे, स्वराज पातोळे, अक्षय पिंपळकर यांनी प्रयत्न केलेत.
