अकोला दिव्य न्यूज : यवतमाळ शहरातील खुनाचे सत्र सातत्याने सुरू आहे. मंगळवार व बुधवार या दोन दिवसात बारा तासांमध्ये खूनाच्या दोन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

तलाव फैल पावर हाऊस परिसरात चुलत जावई व साळा एकत्र दारू पीत असताना वाद झाला. या वादात साल्याने जावायावर चाकूने हल्ला करून जागीच ठार केले. जगदीश ठाकूर वय 48 रा पिंपळगाव झोपडपट्टी असे मृताचे नाव आहे. त्याचा खून नितीन मनोहर कटरे वय 37 पावर हाऊस तलाव फैल याने केला, अशी तक्रार शेरूची पत्नी राधिका ठाकूर हिने शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून नितीन कटरे याला शहर पोलिसांनी अटक केली आहे.

या गुन्ह्याचा पंचनामा संपत नाही तोच पिंपळगाव परिसरात बालाजी मंगल कार्यालयाजवळ लहान भावाने मालमत्तेवरून वाद घालत मोठ्याचा खून केला. ही घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजता घडली. प्रमोद पंढरी पेंदोर वय 37 असे मृताचे नाव आहे. कवीश्वर पंढरी पेंदोर वय 35 असे आरोपीचे नाव आहे.

त्याने लोखंडी रॉड ने मोठ्या भावावर हल्ला करून त्याला जागीच ठार केले. याप्रकरणी प्रमोदची पत्नी सपना यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी कवीश्वर पेंदोर यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

शहर पोलीस ठाण्यातील ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनात शोध पथकातील प्रमुख सहाय्यक निरीक्षक विकास दंदे, जमादार प्रदीप नाईकवाडे, रावसाहेब शेंडे, गौरव ठाकरे, मिलिंद दरेकर, सुनील पैठणे आदींनी दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक केली.
