अकोला दिव्य न्यूज : Mumtaz on Rajesh Khanna: राजेश खन्ना यांचे बॉलीवूडमध्ये महत्त्वाचे योगदान मानले जाते. आजही त्यांच्या अभिनयाची, त्यांच्या गाजलेल्या भूमिकांची मोठी चर्चा होते. अभिनयाबरोबरच दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्या खासगी आयुष्याची मोठी चर्चा होताना दिसते.

आता मुमताज यांनी एका मुलाखतीत राजेश खन्ना बद्दल केलेले वक्तव्य चर्चेत आहे. मुमताज यांनी नुकतीच विकी लालवाणीच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विचारले की राजेश खन्ना व त्या कधी रिलेशनशिपमध्ये होत्या का? यावर उत्तर देताना मुमताज म्हणाल्या, जर मी त्याच्याबरोबर नात्यात असते तर बरं झालं असतं. पण, मी कधीच त्याच्याबरोबर नात्यात नव्हते. मी हजारवेळा राजेश खन्नाबरोबर नात्यात नव्हते असे सांगितले आहे, पण तरीही मला लोक विचारत राहतात.

दिग्गज अभिनेत्री मुमताज काय म्हणाल्या?
राजेश खन्ना माझी मैत्रीण अंजू महेंद्रूच्या प्रेमात होता. पण, त्याने १६ वर्षीय डिंपल कपाडियाबरोबर अचानक लग्न करण्याचा निर्णय घेतला. अंजूला त्याबाबत काहीच कल्पना नव्हती. पण, आजही ती त्याच्या प्रेमात आहे. ती आजही त्याच्याबद्दल बोलते. तिच्या घरात त्याचे फोटो आहेत. ती त्याचा खूप आदर करत असे आणि आजही ती त्याचा आदर करते.

पुढे मुमताज म्हणाल्या, “अंजू उत्तम प्रकारे पाहुणचार करते. जेव्हा माझे लग्न झाले होते, तेव्हा मी व माझे पती अंजूकडे जात असू. मला माहीत होते की ते एकमेकांवर खूप प्रेम करतात. जेव्हा राजेश खन्नाने तिला सोडून डिंपल कपाडियाशी लग्न केल्याचे समजले, तेव्हा मला आश्चर्य वाटले. मला हे अपेक्षित होते. मला आजही असे वाटते की जर राजेश खन्ना अंजूबरोबर राहिला असता, तर तो आजही जिवंत राहिला असता.

अंजू त्याची फुलासारखी काळजी घ्यायची. जेव्हा तो आजारी होता तेव्हा ती त्याच्या घरी राहून त्याची काळजी घ्यायची. त्याच्या खाण्या-पिण्याची, औषधांची ती काळजी घेत असे. अंजू खूप चांगली होती. पण, तुम्ही नशिबाला बदलू शकत नाही.

मुमताज यांनी असादेखील खुलासा केला की, अंजू महेंद्रूबरोबर आजही त्यांची मैत्री आहे. जेव्हा राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडियाशी लग्न केले, तेव्हा मुमताज यांनी अंजू महेंद्रूंना त्याचे कारण विचारले होते. त्यावर अंजू महेंद्रू यांनी म्हटले होते की मला माहीत नाही, मी एका पार्टीमध्ये होते, तिथेच मला समजले की त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तिला तिच्या बॉयफ्रेंडने इतक्या वर्षांच्या नात्यानंतर सोडले म्हणून राग आला नाही. तिला स्वत:ला त्याच्यावर थोपवायचे नव्हते. तिला वाईट वाटले असणार, मात्र तिने तिचे दु:ख कधी दाखवले नाही.

अंजू महेंद्रू यांनीदेखील १९७३ ला दिलेल्या एका मुलाखतीत राजेश खन्ना यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल वक्तव्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, जेव्हा राजेश खन्ना यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरू लागले, त्यावेळी राजेश खन्ना सतत चिडचिड करू लागले; त्यामुळे त्यांच्याबरोबर राहणे कठीण होत चालले होते. असेही म्हटले जाते की, राजेश खन्ना हे त्यांच्या लग्नाची वरात अंजू यांच्या घराजवळून घेऊन गेले होते.

दरम्यान, राजेश खन्ना व डिंपल कपाडिया यांचा घटस्फोट झाल्यानंतर पुन्हा एकदा अंजू त्यांच्या आयुष्यात परत आल्या. त्यांनी राजेश खन्ना यांची पूर्वीसारखी काळजी घेतली. राजेश खन्ना यांचे २०१२ ला निधन झाले.
