Friday, May 2, 2025
HomeUncategorizedभेंडवळचे भाकीत : देशाचा 'राजा' तणावात ! आर्थिक स्थिती बिकट;पीक-पाणी साधारण

भेंडवळचे भाकीत : देशाचा ‘राजा’ तणावात ! आर्थिक स्थिती बिकट;पीक-पाणी साधारण

अकोला दिव्य : Bhendwal Buldhana Ghat Mandani:
अकोला दिव्य न्यूज : बुलढाणा जिल्ह्यासह पश्चिम विदर्भातील हजारो शेतकरी, नागरिकांचे लक्ष वेधलेल्या भेंडवळ येथील घट मांडणीचे बहुप्रतीक्षित भाकीत गुरुवारी, १ मे रोजी जाहीर करण्यात आले. चंद्रभान महाराज यांचे वंशज असलेले सारंगधार महाराज व पुंजाजी महाराज यांनी आज घटमांडणी स्थळाचे व घट, त्यातील पदार्थ, धान्याची स्थिती लक्षात घेऊन हे भाकीत जाहीर केले. यावेळी पश्चिम विदर्भ, जळगाव खान्देश व सीमावर्ती मध्यप्रदेश मधील शेतकरी मोठया संख्येने हजर होते.

यावेळी साधारण पीक पाण्याचे भाकीत वर्तविण्यात आले. देशाची आर्थिक स्थिती बिकट राहील, यामुळे व युद्धजन्य स्थितीमुळे ‘राजा ‘ वर ( पंतप्रधान) प्रचंड ताण तणाव राहील असे भाकीत यावेळी सांगण्यात आले. देशात परकियांचा त्रास वाढणार, प्रलयाची भीती, मंदीचे सावट राहील असे महाराजांनी सांगितले. शेजारी राष्ट्रा सोबत युद्ध होण्याची शक्यता कमी आहे, पण युद्ध झालेच तर तिसऱ्या महायुद्धासारखे होईल असे इशारावजा भाकीत सारंगधर महाराजांनी वर्तविले.

पावसाळ्याच्या पहिल्या महिन्यात कमी पाऊस, नंतरच्या तीन महिन्यात पाऊस चांगला राहील. तसेच भरपूर अवकाळी पाऊस पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पहिल्या महिन्यात पेरण्यांची घाई करू नये असा सल्ला यावेळी देण्यात आली. वर्तवण्यात आलेल्या भाकीतानुसार या वर्षी पावसाळा सर्वसाधारण राहणार असून, पावसाळ्याचा पहिल्या महिन्यात कमी  पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसऱ्या महिन्यात त्यापेक्षा थोडं जास्त पावसाची शक्यता आहे, तिसऱ्या महिन्यात भरपूर पाऊस तर चौथ्या महिन्यात कमी पाऊस असेल असे भाकित पावसासबंधी वर्तवण्यात आले आहे.

दरम्यान यंदा अवकाळी पवासाची शक्यता देखील अधिक असल्याचे म्हटले आहे. यंदा पिकांचे प्रमाण सर्वसाधारण राहणार असून, पिकाच्या नासा़डीचे प्रमाण अधिक राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. धोकादायक बाब म्हणजे यंदा देशात रोगराईचे प्रमाण जास्त राहणार असल्याचे म्हटले आहे.पिका बाबत केलेल्या भाकितांमध्ये गहू, ज्वारी, तांदूळ आणि इतर पिके सर्वसाधारण मोघम स्वरूपाचे सांगण्यात आली आहे. मात्र उत्पन्न चांगलं असलं तरी अवकाळीने या पिकांना फटका बसणार असल्याचे भाकीत यंदा वर्तवण्यात आल आहे.

राजकीय परिस्थितीवरही यंदा भाकीत केल्या गेला आहे. यामध्ये देशाचा राजा कायम असणार आहे. मात्र परकियांचे आक्रमण आणि देशाची आर्थिक स्थिती कमजोर होणार असल्याने राजावर प्रचंड ताण येणार आहे. याशिवाय सध्या देशांमध्ये पाकिस्तानसोबत सुरू असलेले सध्याची शाब्दिक युद्ध खरोखरच्या युद्धामध्ये बदलण्याची शक्यता कमी आहे. मात्र युद्ध झाल्यास तर या वेळी महायुद्ध होईल.

साडे तीनशे वर्षांची परंपरा
शेतकऱ्यांच्या आस्था आणि श्रद्धेच्या कसोटीवर शेतकऱ्याना आपलीशी वाटणारी भेंडवळची घटमांडणी अंदाजे साडेतीनशे वर्षांपूर्वी सुरू झाली आहे. पुरातन नीलवती विद्येचे जाणकार असलेले चंद्रभान महाराज यांनी ही परंपरा सुरू केली. परंपरागत ज्ञान, निसर्गाशी जुळलेली नाळ आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी ही भाकिते वर्तवली. सोबतच पशुपक्ष्यांचे निसर्गासंदर्भातील संकेत अभ्यासून त्यांनी भाकिते वर्तवली होती. त्यांच्या पिढीअंतर्गत सध्याही परंपरा कायम आहे. रामदास महाराज वाघ यांचे निधन झाल्यानंतर सध्या पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज काही वर्षापासून भाकिते वर्तवत आहेत. त्यांची ही अकरावी पिढी आहे.

काल अक्षय्य तृतीयेच्या दिवशी नरहरी शिवराम वाघ यांच्या शेतात घट मांडणी करण्यात आली होती.मांडलेल्या या घटमांडणीत रात्रीतून नैसर्गिकरीत्या झालेल्या बदलांवर आधारित हे भाकीत असते. ही ‘भविष्यवाणी’ ऐकण्यासाठी विदर्भ आणि खान्देश पट्ट्यातील सीमावर्ती भागातील जवळपास पाच हजार शेतकरी उपस्थित होते. या भाकीताच्या आधारेच ते खरीप, रब्बी पिकांचे नियोजन करतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!