अकोला दिव्य न्यूज : घरगुती वादातून रागाच्या भरात पत्नी आणि तीन वर्षांच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरातील समाजमन ढवळून निघाले आहे. शहरातील रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तारफैल परिसरात आज शनिवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

या घटनेत तारफैल येथे राहणाऱ्या सूरज गणवीर उर्फ गोट्या याने रागाच्या आवेशात स्वतःची पत्नी अश्विनी गणवीर (वय 25) आणि तीन वर्षांची मुलगी आयेशा गणवीर यांचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला घटनास्थळीच अटक केली असून, त्याची कसून तपासणी केली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मृत अश्विनी ही सूरज याची दुसरी पत्नी होती. पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणं होत असल्याचं शेजाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. मात्र हत्या करण्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ सतीश कुलकर्णी, पोलीस निरीक्षक अरुण परदेशी यांच्यासह पोलीस दलाने घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. या क्रूर घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, शहरात नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
