अकोला दिव्य न्यूज : कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकारला घेरण्याचे योजिले आहे. अजित पवार यांनी आपण कुठेही कर्जमाफीसंदर्भात बोललो नसल्याचे वक्तव्य केले आहे. यावर भाष्य करताना कडूंनी ‘भाजप हा राष्ट्रवादीचा बाप असल्याचा टोला लगावला आहे. तर पुढील महिन्यापासून त्यांनी आंदोलन छेडणार असल्याची घोषणा केली आहे.

आपण ‘डीसीएम टू सीएम’ आंदोलन करणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. या आंदोलनाची सुरुवात बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर होणार असून शेवट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरातील घरासमोर केला जाणार आहे, असेही कडू म्हणाले.

बच्चू कडू यांनी अकोला येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी आंदोलनाबाबत बच्चू कडू म्हणाले की, ‘२ जूनला बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर’अर्थसंकल्प वाचन आंदोलन’ करुन त्यांना कर्जमाफीची आठवण करुन देणार आहोत. पुढे टप्प्याटप्प्याने पंकजा मुंडे, बाळासाहेब पाटील आणि संजय राठोड यांच्या घरासमोर देखील आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाचा शेवट नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर केला जाईल. त्यामुळे ‘डीसीएम टू सीएम’ अशी या आंदोलनाची रुपरेषा असणार आहे.

तर कर्जमाफी झाली नाही तर आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही बच्चू कडूंनी दिला आहे. तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या अमरावती जिल्ह्यातील गुरुकूंज मोझरी किंवा आपलं जन्मगाव असलेल्या कुरळपूर्णा येथे आपण ७ जुलैपासून आमरण उपोषण करणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले आहेत.

दरम्यान अजित पवारांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन यू-टर्न घेतल्याचे दिसत आहे. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, भाजप राष्ट्रवादीचा बाप असल्याचा आहे. अजित पवार यांनी जरी कर्जमाफीचा शब्द दिला नसला तरीही ज्यांनी त्यांना या पदावर बसवलं, त्या भाजपने कर्जमाफी देण्याचा शब्द दिला होता, असेही कडूंनी नमूद केले आहे.