अकोला दिव्य न्यूज : अकोला शहरातील अग्रसेन चौक ते दक्षता नगर या सरळ व मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या रस्त्यावर उभारण्यात आलेल्या नवीन उड्डाणपूलावर आज बुधवारी पुन्हा एकदा एका निष्पाप जीवाचा बळी गेला. नवीन उड्डाणपुलावरील अशोक वाटीका ते टॉवर दरम्यान मार्गांवरच्या मधात एका दुचाकीचा अपघातात होऊन एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेतील मृत युवकाचे नाव संतोष वनवासे असल्याचे कळते.

प्राप्त प्राथमिक माहितीनूसार, 25 वर्षीय संतोष वनवासे हा मूळ उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून, सिंधी कॅम्प परिसरात वास्तव्य करून पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करीत होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार टॉवरकडून येत असलेल्या गाडी चालक वनवासेची दुचाकी अचानक घसरली आणि पुलाच्या कडेला असलेल्या भिंतीवर जाऊन जोरदार आदळली.

भिंतीला जोरदार धडक दिल्याने वनवासेच डोकं रस्त्यावर आपटले आणि डोक्याला मोठा मार लागल्याने त्याच्या कान व नाकातून रक्तप्रवाह सुरू झाला. काही सेकंदातच चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पुढील प्रक्रिया पार पाडली.