अकोला दिव्य न्यूज : शहरातील एका उच्चभ्रू वस्तीमध्ये बंद सदनिकेत भिन्न धर्मीय तरुण व तरुणी आढळून आले. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून तरुणाविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.आरोपी मूर्तिजापूर येथील नोवेल अली नवाब अली असल्याचे सांगितले जात आहे.

जठारपेठ येथील अपार्टमेंटमधील एका बंद सदनिकेत तरुण व तरुणी गेले होते. त्या सदनिकेतून मुलीच्या ओरडण्याचा आवाज स्थानिकांना ऐकू आला. परिसरातील नागरिकांना संशय आल्याने त्यांनी याची माहिती बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना दिली. त्या कार्यकर्त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सिव्हिल लाईन पोलिसांना अवगत केले.

बजरंग दल, विहिंपचे कार्यकर्ते पोलिसांना घेऊन त्या सदनिकेमध्ये दाखल झाले. त्यावेळी बाहेरुन कुलूप लावले होते. ते कुलूप खोलण्यात आल्यावर त्या सदनिकेमध्ये भिन्न धर्मीय तरुण व तरुणी आढळून आले. दोघांनाही सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी त्यांची प्राथमिक चौकशी केली. या प्रकरणात तरुणीने आरोपीविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली.

सिव्हिल लाईन पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात बीएनएस ७५ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
