अकोला दिव्य न्यूज : Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढत असून दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थितीचे संकेत मिळत आहेत. त्यातच भारताने पाकिस्तानी सीमेजवळील पंजाबच्या फिरोजपूरमध्ये ब्लॅकआऊट प्रॅक्टिस सुरू केली आहे. पंजाबच्या फिरोजपूर येथील भारतीय सैन्याने छावणीत रात्री अर्धा तासासाठी ब्लॅकआऊट अभ्यास केला.

हा अभ्यास रात्री ९ ते ९.३० या काळात करण्यात आला. ज्यात संपूर्ण परिसरात पूर्णत: अंधार ठेवण्यात आला होता. फिरोजपूरमध्ये ब्लॅकआऊट अभ्यास यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्थानिक रहिवाशांकडे मदतीचं आवाहन केले होते, ज्यात घरात अथवा घराबाहेर कुठलाही इन्वर्टर किंवा जनरेटर लाईट दिसू नये. हा सराव संभाव्य युद्धाच्या तयारीचा भाग मानला जात आहे.

दरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने भारतातील सर्व राज्यांना उद्या बुधवार ७ मे रोजी नागरी संरक्षणासाठी ‘मॉक ड्रिल’ घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने एक्सवर (ट्विटर) दिलं आहे.

पाकिस्तानसोबत युद्धाचे ढग दिसताना देशातील जनतेला युद्धाच्या काळात कसं तयार राहायचे याचे प्रशिक्षण देण्यास केंद्र सरकारने राज्य सरकारला सूचना केल्यात. गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन सिस्टम शहरात लावणे, सामान्यांना आवश्यक ट्रेनिंग देण्याची सूचना केली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने नेमकं काय निर्देश दिले?
भारतातील सर्व राज्यांना नागरी संरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ७ मे रोजी ‘मॉक ड्रिल’ घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये या दिवशी सर्व राज्यांत सायरन वाजले जातील. जेव्हा हल्ला होतो, तेव्हा सूचना देण्यासाठी सायरन वाजवले जातात. मात्र, सर्व राज्यातील सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे की नाही? किंवा सुरक्षा यंत्रणा तपासण्यासाठी या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती सांगितली जात आहे.