अकोला दिव्य न्यूज : अमरावतीमधिल राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्योती कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका २२ वर्षीय कॉलेज तरुणाची चाकुने भोसकुन हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास समोर आली. तरुणाच्या मारेकऱ्यांचा राजापेठ पोलिस शोध घेत आहेत.

देवांशु अनिल फरताडे (२२, ज्योती कॉलनी, सिपना कॉलेज रोड, अमरावती) असे मृतक तरुणाचे नाव आहे. देवांशु हा मंगळवारी सांयकाळी घराच्या परिसरातच असलेल्या मोकळ्या मैदानात असताना त्याच्यावर तीन ते चार जणांनी चाकुने हल्ला चढवला. यावेळी त्याच्या पोटात चाकूचे घाव करण्यात आले. यातच तो रक्तबंबाळ झाला व त्याचा मृत्यू झाला. मारेकऱ्यांची नावे पोलिसांसमोर आली असून त्यांचा शोध घेण्यासाठी राजापेठ पोलिसांचे पथकं रवाना झाले आहेत. देवांशुचा खुन कोणत्या कारणासाठी झाला याबाबत पोलिस माहीती घेत आहेत. घटनेची माहीती राजापेठ पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी दाखल झाले होते. मारेकरी हे देवांशूच्या परिचित असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेने मात्र परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.