Wednesday, May 7, 2025
HomeUncategorizedआज अकोल्यातील एका ध्येयवेड्या 'नेत्र महर्षी' च्या वाढदिवसानिमित्त........

आज अकोल्यातील एका ध्येयवेड्या ‘नेत्र महर्षी’ च्या वाढदिवसानिमित्त……..

अकोला दिव्य : आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात, गल्लोगल्ली वाढत चाललेल्या स्व:नाम धन्य समाजसेवकांच्या जमातीला, नेमकी समाजसेवा काय? हे कधी उमजेल ? असा प्रश्न निर्माण होतो आहे. तेव्हा आठवतात ते लोक, ज्यांनी अत्यंत प्रतिकूल अशा कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीही आपल्या प्रत्यक्ष कृतीतून समाजसेवा म्हणा की सामाजिक बांधिलकी सिद्ध केली. परंपरेचं जोखड मानेवर ठेवून, अंतिम संस्कार होईस्तोवर मृतदेहालाही हळूवारपणे हाताळण्याची मानसिकता असलेल्या समाजात ३८ वर्षांपूर्वी मृतकाचे नेत्र काढणं म्हणजे अक्षरशः वाघाच्या जबड्यात हात घालणं !

पण काही ध्येयवेडी माणसं हे धाडस करतात आणि कालांतराने त्यांच्या धाडसाने अनेकांचे जीवन प्रकाशमान होते, अनेकांच जगणं सार्थक होते. असंच अनेकांचं जगणं सार्थक आणि अनेकांच्या जीवनात प्रकाश झोत आणत, डॉ.चंद्रकांत छोगालाल पनपालिया यांनी समाजात मृत्यू नंतरही जगणं रुढ केले. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गाव खेड्यात, प्रत्येक घरादारात ‘नेत्रदान’ संकल्पना पोहचवण्यासाठी पनपालिया यांनी झपाटल्या सारखं हे कार्य केले आणि लोकांनाही हे मनापासून भावले म्हणून, अवघ्या ४ दिवसाच्या नवजात शिशूचे निधन झाले. तेव्हा त्या नवजात शिशूचा पाल्यांनी त्याचे डोळे देऊन पनपालिया यांच्या सामाजिक बांधिलकीवर शिक्कामोर्तब केले.

आज अवयवदान चळवळीस सरकार गती देत असून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. मात्र आजपासून ३८ वर्षांपूर्वी डॉ पनपालिया यांनी ख-याअर्थाने अवयवदानासाठी बीजारोपण केले.हे मान्य करावे लागेल. स्वतःच जगणं काळजाच्या कोपऱ्यात दाबून, दृष्टीबाधीतांना हे साजर, सुंदर आणि अद्वितीय जग दाखविण्यासाठी अविश्रांतपणे झटणारे डॉ. पनपालिया यांनी नेत्रदान व नेत्ररोपनासोबत मुंबई येथील के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये गरजू व्यक्तींसाठी दोन हजार बॉटल रक्ताचा साठा करण्याचे महत्त्वाचे कार्य केले.

रक्ताच्या एका थेंबाविना माणूस मरु शकतो. हे अधोरेखित करीत डॉ. पनपालिया यांनी अनेकांना या कार्यात सहभागी करुन, आपल्या अल्पशा सहभागाने इतरांना जीवनदान मिळू शकतं, हे समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचते केले. या कार्याने अनेकांना जीवनदान मिळू लागले, तेव्हा त्यांच्या या उपक्रमास हर्षदीप कांबळे आणि विकास अधिकारी रविंद्र इंगळे यांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले.

डॉ. पनपालिया मानवी जीवनाच्या हितासाठी रक्त आणि नेत्र या अमुल्य व आवश्यक घटकांचा ठेवा सुरक्षित करण्यासोबतच भिंगारोपन शस्त्रक्रिया, लहान बालकांचा जंतचा रोग अर्थात जंताचे निवारण करण्यासाठी देण्यात येणाऱ्या लसी व औषधीचे वाटप मेंदू रोग निदान शिविर, व्यसनमुक्ती शिबिर अशा विविध सामाजिक कार्यासाठी सिंहाचा वाटा उचलला आहे.

अकोला नेत्र एवं नेत्ररोपन संशोधन केंद्राचं माहेरघर असलेल्या नेत्र कमलांजली चॅरिटेबल हॉस्पिटलनं बघता बघता २५ वर्षाचा टप्पा गाठला आणि हजारों नेत्र बाधितांना दृष्टीलाभ मिळाला. हे सहजासहजी उपलब्ध झाले नाही. तर हजारो लोकांना मरणोत्तर नेत्रदान करण्यासाठी प्रवृत्त करुन या नेत्रदान चळवळीत प्राण फुंकले. अनेकवेळा मृतांच्या नातेवाईकांची समज काढून नेत्रदान करुन घेत जालना येथील गणपती नेत्रालयाच्या सहयोगाने हजारो दृष्टी बाधितांना ‘नजर’ मिळवून दिली.

वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना काळाची पावले ओळखून नेत्रदान चळवळीत मोठं यश मिळवूनही डॉ. पनपालिया यांच्या स्वभावात अभिमानाचं बीजारोपण झाले नाही तर आजही अतिसामान्य माणूस म्हणून वावरताना दिसतात. सरळसोट बोलणं- वागणं हा त्यांचा स्थायीभाव असून अनेकांना ते पचणी पडत नाही पण चंदूभाऊंनी यावर विचार केल्याचे आठवतं नाही. उलट अपना तो ऐसा ही है ! असं मनमोकळेपणाने मान्य करतात.

रक्तदान आणि नेत्रदान, हे त्यांचे श्वास की प्राण असल्यानेच त्यांनी 94221 61919 हा मोबाईल नंबर अहोरात्र सुरू ठेवला आहे. अत्यंत विपरीत परिस्थितीत यशाचा हा टप्पा गाठला आहे. एक ध्येयवेड्या व्यक्तीच्या तब्बल ३८ वर्षांपासून निरंतर सुरू असलेल्या सामाजिक कार्याची, उपक्रमाची संक्षिप्त दखल घेणे अशक्य आहे. मात्र पश्चिम विदर्भात अकोल्याचे डॉ. चंद्रकांत पनपालिया एवढे जरी म्हटले की, मृतदेहाचे डोळे काढणारेच ना, असं समोरची व्यक्ती उद्गारल्यावीना राहत नाही आणि हेच त्यांच कार्यकर्तृत्व सांगण्यात पुरेसे बोलके आहे.

डॉ.पनपालिया यांच्या कार्याची दखल घेवून महाराष्ट्र शासनातर्फे २००४ चा रक्तदान गौरव पुरस्कार तत्कालीन आरोग्य मंत्री खानविलकार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आज शहर, जिल्हा नव्हे तर चक्क राज्य पातळीवर नेत्रदान व नेत्ररोपन क्षेत्रात अकोल्याचे नावलौकिक असून इतरांना यासाठी प्रेरणास्थान झालेले डॉ. चंद्रकांत पनपालिया यांच्या संपुर्ण कामाचा गोषवारा देण्यासाठी केवळ एकच शब्द म्हणजे ‘नेत्र महर्षी’ हा पुरेसे आहे.

चंदूभाऊ आज बुधवार ७ मे २०२५ रोजी वयाच्या ७१ व्या वर्षात पदार्पण करीत असल्याचे निमित्ताने त्यांच्या कार्याचा ओझरता आढावा घेत शेवटी एवढंच की,
जीवन की सुगंध का आनंद वही ले सकता है, जो खिलने और बिखरने वाले पलों के बीच महक जाने की काबिलियत रखता हो ! डॉ.पनपालिया आपण असंच कार्यरत राहून सेवेचं शतक साजरे करावे,हीच मनोकामना……

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : अकोला दिव्य

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!