Thursday, May 8, 2025
HomeUncategorizedलष्कराची मोठी कारवाई ! लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त

लष्कराची मोठी कारवाई ! लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त

अकोला दिव्य न्यूज : India Strike Down Pakistans Air Defence System: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल भारतानं सुरू केलेलं ऑपरेशन सिंदूर अजूनही चालू असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सकाळी सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं. त्याच्या काही तासांत संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनामध्ये भारतीय लष्करानं थेट पाकिस्तानच्या लाहोरजवळील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

बुधवारी पहाटे केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये भारतानं पाकिस्तानातील दहशतवादी तळ लक्ष्य केले होते. गुरुवारी सकाळच्या कारवाईत पाकिस्तानात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या एअर डिफेन्स रडार सिस्टीमला भारतीय हवाई दलानं लक्ष्य केल्याची माहिती या निवेदनात देण्यात आली आहे. पाकिस्तान ज्या प्रकारे कारवाई करेल, त्याच पद्धतीने भारताकडून उत्तर दिलं जाईल. अशी माहिती समोर आली आहे की लाहोरजवळील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त झाली आहे, असं संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.

७ तारखेच्या पत्रकार परिषदेची करून दिली आठवण
दरम्यान, या निवेदनात भारताला ही कारवाई का करावी लागली, यासंदर्भात उल्लेख करण्यात आला आहे. ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारतानं हे स्पष्ट केलं होतं की आमची कारवाई ही पूर्णपणे दहशतवादी तळांवर केंद्रीत असून कोणत्याही लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्यात आलेला नाही. त्याचवेळी भारतीय लष्करानं स्पष्ट केलं होतं की भारतात लष्करी ठिकाणांवर कोणत्याही प्रकारे हल्ला केल्यास त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल, अशा शब्दांत या निवेदनातून भूमिका मांडण्यात आली आहे.

पाकिस्तानला दिला इशारा
दरम्यान, भारतीय संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानच्या या आगळिकीवर इशारा दिला आहे. “पाकिस्तानच्या या प्रयत्नात १६ निरपराध नागरिकांचा हकनाक बळी गेला आहे. त्यात तीन महिला व पाच लहान मुलांचा समावेश होता. पाकिस्तानकडून होणारा हा हल्ला रोखण्यासाठी भारताला प्रत्युत्तर देणं भाग पडलं. भारतीय लष्कर पुन्हा एकदा हे स्पष्ट करत आहे की आम्ही तणाव न वाढवण्यासाठी बांधील तेव्हाच आहोत, जेव्हा पाकिस्तानी लष्कराकडूनही या गोष्टीचं पालन केलं जाईल, अशा शब्दांत भारतीय लष्करानं पाकिस्तानला ठणकावलं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!