अकोला दिव्य न्यूज : धनादेश अनादर प्रकरणी आरोपी गजानन ज्ञानदेवराव पोलाखडे रा. जुने शहर अकोला यास 3 लाख 50 हजार रुपये दंड व तीन महिन्यांचा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी हकीकत अशी की, स्थानिक खेडकर नगर येथील रहिवाशी अक्षय प्रदीप खाडे हे कोल्ड्रिंक्स व पाणी बॉटल विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी गजानन पोलाखडे यांना विश्वासावर उधारीत माल पुरविला होता. या व्यवहाराच्या परतफेडी करिता पोलाखडे यांनी अक्षय खाडे यांना दिलेला धनादेश खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने अनादरीत झाला.

हा धनादेश न वटता परत आल्याने फिर्यादी अक्षय खाडे यांनी अँड. विनय यावलकर यांचे मार्फत पोलाखडे यास नोटीस पाठवून त्यांना धनादेशाच्या रकमेची मागणी केली. परंतु वारंवार मागणी करूनही त्यांनी रक्कम दिली नाही. नोटीस मिळाल्यानंतरही विहित मुदतीत आरोपीने अनादरीत धनादेशाची रक्कम न दिल्यामुळे फिर्यादी अक्षय खाडे यांनी वकिलामार्फत न्यायालयात कलम 138 एन. आय. ॲक्टनुसार प्रकरण दाखल केले होते.
दोन्ही पक्षाचे पुरावे व युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपी पोलाखडे यास विद्यमान 9 वे अतिरिक्त न्यायदंडाधिकारी एन.डी.जाधव यांनी दोषी ठरवून पोलाखडे यास 3 लाख 50 हजार रुपयांचा दंड व तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. सदर दंडाची रक्कम एक महिन्याचे आत फिर्यादीस देण्याचा आदेश केला. आरोपीने एक महिन्याच्या आत ही रक्कम न दिल्यास अतिरिक्त तीन महिन्यांचा कारावास आरोपीस भोगाव लागेल. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. सदर प्रकरणात फिर्यादीतर्फे अँड. विनय यावलकर यांचे सोबत अँड. निखिल देशमुख व अँड.सुमित ठाकूर यांनी काम पाहिले