अकोला दिव्य न्यूज : तुम्ही ‘वेंग द डॉग’ नावाचा सिनेमा बघितला नसेल तर जरूर पाहा. १९९७ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमात रॉबर्ट डी नीरो आणि डस्टिन हॉफमन आहेत. एका घोटाळ्यात अडकलेला राष्ट्राध्यक्षांवर लोकांचं लागलेलं लक्ष त्यापासून हटवण्यासाठी आणि उत्तरदायित्व टाळण्यासाठी युद्धाची निर्मिती कशी करतो, यावर हा सिनेमा आधारलेला आहे. एक लक्षात असू द्या. ही एक उपहासात्मक ‘ब्लॅक कॉमेडी’ आहे. त्यामुळे त्यात विपर्यास आहे. पण मी या सिनेमाचा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे राजकीय ‘मॅनीप्युलेशन’ करण्यामध्ये प्रसारमाध्यमांची भूमिका काय असते यावर त्यात अत्यंत प्रखर भाष्य केलेलं आहे. अवघड प्रश्न किंवा गैरसोयीच्या वास्तवापासून लोकांचं लक्ष विचलित करून अध्यक्षांना त्यांची सार्वजनिक प्रतिमा प्रस्थापित करण्याकरता प्रसारमाध्यमं कशी एक हत्यार बनतात हे यात दाखवलंय.

आज, वीस वर्षांनंतरही ‘वेंग द डॉग’ हा चित्रपटच भारतीय वृत्तवाहिन्यांमधून रोज अनुभवायला मिळतोय. राष्ट्रभक्तीचा फाजील आव आणून केलेलं अँकरिंग आणि दुसऱ्या कोणाच्या तरी जिवावर बेतलं तरी हरकत नाही, पण बहुसंख्य दर्शकांना रक्तपिपासू बनवणारं वृत्तांकन देण्यात धन्यता मानत आहेत,असो ! सध्याच्या घडामोडीविषयी संवेदनशीलतेने ‘रिपोर्टिंग’ करताना एक महत्त्वाचा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे: जगातल्या सर्वाधिक लष्करी अस्तित्व असलेल्या प्रदेशांपैकी एक असलेल्या भागात पाच सशस्त्र दहशतवादी घुसून असा हल्ला कसा करू शकले ?
सुरक्षेच्या बाबतीत झालेल्या या अत्यंत गंभीर हलगर्जीपणाची जबाबदारी कोण घेणार?
२०१९मध्ये पुलवामा इथे झालेल्या महाभयंकर हल्ल्यात भारताचे ४० सैनिक मारले गेले होते. या हल्ल्याआधी गुप्तचर खात्याने दिले गेलेले ११ इशारे दुर्लक्षिले गेले होते याची आठवण आहे तुम्हाला ? या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याची जबाबदारी कोणाची होती, याचं उत्तर अजून तरी मिळालं का आपल्याला ?
नाही मिळालं. कारण, प्रसारमाध्यमांनी बालाकोट हल्ल्यानंतर ‘बॅग द डॉग’ची आपली भूमिका पार पाडली. हा हल्ला साजरा केला गेला आणि ज्या हलगर्जीपणामुळे ४० सैनिकांचा मृत्यू झाला, त्याला जणू माफ करण्यात आलं. तुम्ही आमची माणसं मारली, आम्ही तुमची मारली, झाली- फिट्टफाट असं म्हणून सगळं सामान्य झालं. जे टाळता आलं असतं त्या शहिदांच्या मृत्यूची जबाबदारी दुर्लक्षिली जाणं यासारखा त्यांचा दुसरा अनादर नाही.
सहा वर्षांनंतर पुन्हा तेच घडताना दिसतंय. भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याची क्षणचित्रं म्हणून किमान चार मुख्य वृत्तवाहिन्यांनी गाझाचं जुनं ‘फूटेज’ वापरलं. ही बातमी सांगत असताना वापरण्यात आलेली भाषा म्हणजे निव्वळ सनसनाटी होती. युद्धासारख्या गंभीर गोष्टीला प्रेक्षकांकरता एक स्वस्तातलं मनोरंजन बनवणारी. आणि हे वृत्तांकन पाहणारा तरी कोण ? युद्धामध्ये ज्यांचं घर जळणार नाही, घरात येणारं अन्न आणि वीज थांबणार नाही असे !

युद्धाचं वार्तांकन कसं करावं ? सणसणीत की माणसांच्या कहाण्यांमधून युद्धाचे फायदे कोणाला, कसे होतात यावर लक्ष वेधणारे ! कोणत्याही प्रकारच्या युद्धामुळे समाजातल्या एका विभागाच्या मानवी हक्कांचं उघडपणे उल्लंघन होतं. आणि बहुतेक वेळा हे समाजातले दुर्बल घटक असतात. त्यांचं नुकसान हा युद्धाचा स्वाभाविक परिणाम आहे असं म्हणून त्याचं समर्थन न करता त्यांच्या अडचणींवर प्रकाशझोत टाकणं, हे संवेदनशीलतेने केलेलं वार्तांकन असतं. युद्ध हा कधीच चांगला पर्याय नसतो, हे आपल्या दर्शकांना सांगणं म्हणजे चांगलं ‘रिपोर्टिंग’ असतं.
बेंजामिन फ्रँकलिनने म्हटल्याप्रमाणे, “देअर इज नो गुड वॉर अॅण्ड बॅड पीस.” चांगलं युद्ध आणि वाईट शांतता असं कधीच नसतं.
पण अशा प्रकारच्या पत्रकारितेसाठी वेळ, कौशल्य आणि महत्त्वाचं म्हणजे धैर्य लागतं. एअरकंडिशन्ड स्टुडिओमध्ये बसून युद्धज्वर पसरवणं त्यापेक्षा खूपच सोपं आहे. कारण त्यासाठी दुसऱ्या कोणाच्या तरी रक्ताची किंमत दिली जातेय. तुमचे ‘प्राइम टाइम शोज’ पाहताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, सूड उगवण्याची भाषा बोलणाऱ्यांच्या घरांवर बॉम्ब पडणार नसतात. रात्री-अपरात्री त्यांना त्यांच्या घरातून बाहेर पडावं लागणार नसतं. किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीवर अंत्यसंस्कारही करावे लागणार नसतात.
भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने उत्तरादाखल काश्मीरच्या पुँछ भागात सीमेजवळ गोळीबार करून १३ निरपराध काश्मिरींची हत्या केली. गेली पाच वर्षं इथली कुटुंबं बऱ्यापैकी शांततेत राहात होती, कारण इतका काळ तिथे युद्धविराम होता. अचानक एका रात्रीत त्यांच्या आयुष्यात उलथापालथ झाली. आसऱ्यासाठी त्यांना बाहेर धाव घ्यावी लागली. काही त्यात यशस्वी झाले, काही मृत्युमुखी पडले.
देशभरात भारत सरकारने ‘मॉक ड्रिल’ आयोजित केलं होतं. पण मग पाकिस्तान काहीतरी गडबड करेल याचा विचार करून सीमारेषेजवळ असलेली गावं सरकारने हवाई हल्ला करण्यापूर्वी रिकामी का नाही केली? प्रश्न विचारायचेच ठरवले तर हाही प्रश्न विचारता येईलच की !