अकोला दिव्य न्यूज : सात वर्षे उलटली… आश्वासनं दिली गेली… वेळोवेळी पत्रव्यवहार झाला… बैठका झाल्या… पण न्यू तापडिया नगर मार्गावरील उड्डणपूलाचं काम आजही अपूर्णच. गेट क्रमांक ३८ जवळ सुरू असलेल्या कामामुळे आता जनतेची सहनशक्ती संपली आहे. राज्य सरकारने आतापर्यंत या पुलासाठी आवश्यक असलेला ५४ कोटीचा निधी दिला नाही. वित्त विभागात फाईल रेंगाळतय, तांत्रिक चुका सांगितल्या जात आहेत, पण शेकडो कुटुंबांचं जीवन जगणं अवघड होते आहे.

टू व्हिलर साठी दिलेला पर्यायी रस्ता हा मृत्यूचा सापळा बनला आहे. आजही त्या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यांत भीती असते. पावसाळा तोंडावर आला असून मागील पावसाळ्यात हा मार्ग चिखलाचा होऊन बंद झाला होता. ही केवळ निधीची गोष्ट नाही तर हा लोकांच्या भावनांशी, त्यांच्या सुरक्षिततेशी खेळण्याचा प्रकार आहे. हे सरकार लोकशाहीच की दडपशाहीच ? असा रोष व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीचे शहर संघटक निलेश देव यांनी प्रशासनाला तीव्र इशारा दिला आहे.

ते म्हणाले, जर सरकारला निधी देता येत नसेल, तर जनतेकडून निधी गोळा करू. ‘निधी संकलन रथ यात्रा’ काढून उड्डाणपूलासाठी पैसा गोळा करू. आता पुलासाठीचा लढा हा फक्त विकासाचा नाही, तर अस्तित्वाचा प्रश्न झाला आहे. हे सरकार झोपलंय, पण आम्ही झोपू देणार नाही.

निलेश देव यांनी रेल्वे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागालाही दोषी ठरवत, त्यांच्याकडून वेळोवेळी पत्रव्यवहार व मागणी करूनही कोणतीही ठोस कृती न झाल्याचे दाखवून दिले. हा रस्ता लवकर व्यवस्थित झाला नाही आणि निधी वितरीत करून उड्डाणपूलाचे काम तातडीने सुरू झालं नाही, तर निधी संकलन रथ यात्रा व जनआंदोलन छेडण्यात येईल, याची पूर्ण जबाबदारी शासनावर असेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.