अकोला दिव्य न्यूज : विदर्भातील ११ जिल्ह्यांमधील तरुणाईला त्यांच्यातील उपजत कलागुणांना व क्रीडा क्षेत्रातील प्रदर्शनासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच धार्मिक, सामाजिक, व्यावसायिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांची रेलचेल असलेले राज्यस्तरीय सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव आणि युवा संमेलन चांदीचं माहेरघर असलेल्या खामगांवात आयोजित करण्यात आले आहे.

बुलढाणा जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेच्या आतिथ्यात विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी युवा संघटनेने आयोजित राज्यस्तरीय सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव आणि युवा संमेलन १४ आणि १५ जून रोजी खामगाव शहरातील श्रीहरी लॉन आणि जी.एस. महाविद्यालयाच्या परिसरात होणार आहे.
या दोन दिवसांच्या अधिवेशनात राजकारण, समाजसेवा, कला आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे समाजातील तरुणांमध्ये एकता, प्रतिभा, नेतृत्व आणि संघटनात्मक कौशल्ये विकसित करण्याच्या मुद्यावर हे आयोजन करण्यात आले.
केवळ तरुणांसाठी एक व्यासपीठ नाही तर हे अधिवेशन त्यांना प्रेरणा देणारा ठरेल.त्यांना संस्कृती, कला आणि नेतृत्वाकडे घेऊन जाईल. तेव्हा माहेश्वरी समाजातील तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन आपल्या कलागुणांना वाव द्यावा असे आवाहन राज्य युवा संघटनेचे अध्यक्ष सागर लोहिया, सचिव अमोल बजाज, कोषाध्यक्ष अनुज मुंध्रा, कार्यक्रम प्रमुख दीपांशु भैया, समन्वयक सुश्री पूजा मानधना आणि प्रसन्ना मुंध्रा, प्रचार मंत्री अमोल चांडक आणि बुलढाणा जिल्हाध्यक्ष कन्हैया बंग आणि सचिव अंशुल राठी यांनी केले आहे.