अकोला दिव्य न्यूज : Donalt Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सत्ता काबीज केल्यापासून आपल्या देशाचा व्यापार वाढवण्यासाठी मोठमोठे निर्णय घेत आहेत. या कामात ते इतके बुडाले आहेत की, दहशतवाद्यांशी संबंध ठेवण्यातही मागचा पुढचा कुठलाही विचार करत नाहीत. ट्रम्प सध्या मध्य पूर्वच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी सीरियावर लादलेले सर्व निर्बंध उठवण्याची घोषणा केली अन् बुधवारी सकाळी सीरियन राष्ट्रपती अहमद अल-शारा यांचीही भेट घेतली. विशेष म्हणजे, अल-शाराला अमेरिकेने कुख्यात दहशतवादी घोषित केले असून, त्यांच्यावर दहा लाख डॉलर्सचे बक्षीस आहे.

अल-शारा हे सीरियन अतिरेकी संघटना हयात तहरीर अल-शामचा प्रमुख आहेत. याच संघटनेने सीरियातून बशर अल-असद यांना उलथवून टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या संघटनेचाही अमेरिकेच्या बंदी यादीत समावेश आहे. दहशतवाद संपवण्याच्या नावाखाली मध्यपूर्वेतील अनेक देशांवर कारवाई करणारा अमेरिकेचा प्रमुख आज एका ‘दहशतवाद्या’ला भेटतो, यामुळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महत्वाचे म्हणजे, गेल्या 25 वर्षांत सीरिया आणि अमेरिकेचे प्रमुख नेते एकमेकांना भेटण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अल-शारांचा दहशतवादाशी दीर्घकाळ संबंध?
अहमद अल-शारा यांना अबू मोहम्मद अल-जुलानी म्हणून ओळखले जाते. पण सीरियाच्या पतनानंतर त्यांनी अल-शारा नाव ठेवले आहे. ते हयात तहरीर अल-शामचा नेते असून, अनेक देशांनी आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी दहशतवादी संघटना घोषित केले आहे. त्यांना सीरियन संघर्षातील एक प्रमुख व्यक्ती मानले जाते. त्यांनीच एचटीएसला बशर अल-असदची राजवट उलथवून टाकण्यास मदत केली. केवळ एचटीएसच नाही, तर तो अल-कायदाशीही संबंधित आहे. एचटीएसला अल-कायदाची सीरियन शाखा म्हणून ओळखले जात असे. अल-शारावर इराकमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचाही आरोप आहे.

अल-शारा स्वतःला उदारमतवादी दाखवतो
सीरियामध्ये सत्ता हाती घेतल्यापासून अल-शारा स्वतःला उदारमतवादी म्हणून दाखवत आहे. ते पाश्चात्य नेत्यांसारखे सूट घालून सीरियाच्या विकासासाठी पाश्चात्य निर्बंध उठवणे आवश्यक असल्याचे म्हणतात. अल-शारांना सौदी आणि कतार सारख्या प्रमुख सुन्नी देशांचा पाठिंबा आहे. ट्रम्प यांना मध्यपूर्वेच्या या दौऱ्यातून अमेरिकेत मोठी गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यामुळेच सौदीच्या राजकुमारांच्या दबावाखाली ट्रम्प यांनी अल शाराची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.