Tuesday, May 20, 2025
HomeUncategorizedअनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी

अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी

अकोला दिव्य न्यूज : राज्यातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे विविध भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. कुठे झाडं कोसळली, कुठे मोबाईल टॉवर जमीनदोस्त झाला, तर कुठे पत्र्याची छते उडाली. काही ठिकाणी वीज पडून जनावरांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे. या अवकाळी पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली आहे.

मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, नाशिक अशा प्रमुख जिल्ह्यांसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाने झोडपले आहे. काही भागांत पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागरिकांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

मुंबईत अनेक भागात पाऊस, नागरिकांची धांदल

मुंबईच्या पश्चिम उपनगरांत सायंकाळी सात वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, विलेपार्ले, सांताक्रुझ आणि वांद्रे भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईकरांना या पावसाने उकाड्यापासून दिलासा दिला असला, तरी काही सखल भागांत पाणी साचायला लागल्याने नागरिकांची धांदल उडाल्याचे पाहायला मिळाले.

पुण्यात होर्डिंग कोसळले, गाड्यांचे नुकसान
पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी दुपारनंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याचे पाहायला मिळाले. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीजवळ सणसवाडी येथे एक होर्डिंग पडल्याची घटना घडली. या होर्डिंग्जखाली 7-8 दुचाकी अडकल्या होत्या. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. पावसामुळे पुण्यातील बाणेर भागातील रस्ते जलमय झाले. बीटवाईज चौकात अनेक वाहने पाण्यात अडकली. विशेष म्हणजे हा परिसर स्मार्ट सिटी प्रकल्पाचा भाग आहे.

रत्नागिरीत पावसामुळे रेल्वेसेवेवरही परिणाम

दुसरीकडे, रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाने कहर केला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. अवकाळी पावसाचा परिणाम रेल्वेसेवेवरही दिसून आला आहे. मुंबईकडे जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेस व तेजस एक्स्प्रेस या गाड्या नियमित वेळेपेक्षा दोन तास उशिराने धावत आहेत.

नाशिकमध्ये झाड उन्मळून पडले

नाशिक जिल्ह्यात सायंकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कॉलेज रोडसह अन्य भागांत झाडे उन्ममळून पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये अनेक वाहनांचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने जीवितहानी टळली. विद्युत पुरवठ्यावर मात्र मोठा परिणाम झाला असून अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात वीज पडून 4 म्हशी ठार

जळगाव जिल्ह्यातही आज वीजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. जामनेर तालुक्यातील सुनासगाव येथे वीज कोसळून 4 म्हशी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे गावातील शेतकरी गोपाल इंधाते यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. म्हशी दगावल्याने इंधाते परिवाराच्या उदर निर्वाहाचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

साताऱ्यात मोबाईल टॉवर पडला, दोघे जखमी

सातारा जिल्ह्यात अचानक आलेल्या मुसळधार पावसासोबत जोरदार वाऱ्याचा कहर पाहायला मिळाला. ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटात आलेल्या या वादळात कास-यवतेश्वर मार्गावर मोठी दुर्घटना घडली. जोरदार वाऱ्यामुळे रस्त्यालगतचा मोबाईल टॉवर कोसळला. या दुर्घटनेत चार ते पाच गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. टॉवर कोसळल्यामुळे यवतेश्वर कास रस्ता सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरासाठी पूर्णपणे ठप्प झाला होता. परिणामी, वाहनांची लांबच लांब रांग लागली होती आणि वाहतूक काही काळ पूर्णतः विस्कळीत झाली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!