अकोला दिव्य न्यूज : राजस्थान पोलिसांनी भोपाळमधून एका २३ वर्षीय युवतीला अटक केली आहे. या युवतीने गेल्या ७ महिन्यात वेगवेगळ्या २५ युवकांशी लग्न केले. लग्नाच्या आडून ही युवती फसवणूक करत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या. या युवतीचं नाव अनुराधा पासवान आहे. पोलीस तिला लूट अँन्ड स्कूट ब्राईड म्हणत आहे. याचा अर्थ ती युवकांसोबत लग्न करायची आणि त्यानंतर बहाण्याने त्यांना लुटून पळून जायची.

माहितीनुसार, अनुराधा एका मोठ्या टोळीचा भाग आहे. त्यांची टोळी अशा पुरुषांना टार्गेट करत होती जे लग्नासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. लग्नानंतर अनुराधा त्यांच्या घरातील मौल्यवान दागिने, साहित्य घेऊन पळून जात होती. अनुराधाच्या कामाची पद्धत एकसारखीच होती. ती नवरी बनून घरात प्रवेश करायची, कायदेशीरपणे ती युवकांसोबत लग्न करायची. काही दिवस त्याच्यासोबत थांबायची त्यानंतर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत घरातील सोने, रोकड, इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन तिथून पसार व्हायची असं तपास अधिकारी मीठा लाल यांनी सांगितले.
सवाई माधोपूरच्या पीडिताने केली तक्रार
हा प्रकार सवाई माधोपूरच्या विष्णु शर्मा नावाच्या युवकाने ३ मे रोजी तक्रार केल्यानंतर उघडकीस आला. विष्णुने सांगितले की, त्याने सुनीता आणि पप्पू मीणा नावाच्या २ एजेंटला २ लाख रुपये दिले होते. या एजेंटने विष्णुला लग्नासाठी चांगली मुलगी शोधून देण्याचं आश्वासन दिले. त्यानंतर अनुराधाला त्याच्यासाठी योग्य जोडीदार असल्याचे सांगत त्याचे लग्न लावून दिले. स्थानिक कोर्टात २० एप्रिलला विष्णु आणि अनुराधाचे लग्न झाले. परंतु लग्नाच्या काही दिवसांनीच अनुराधा घरातले सामान घेऊन पसार झाली.

पतीपासून विभक्त राहते अनुराधा
अनुराधा याआधी उत्तर प्रदेशातील महाराजगंज इथल्या एका हॉस्पिटलमध्ये काम करत होती. घरगुती भांडणानंतर ती पतीपासून विभक्त राहू लागली. त्यानंतर पुढे ती भोपाळला आली. इथं येऊन तिने लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीसोबत काम केले. स्थानिक एजेंटच्या माध्यमातून ती युवकांशी लग्न करायची. हा एजेंट व्हॉट्सअपवर नवरीचे फोटो दाखवायचा. लग्न जमवण्यासाठी तो २-३ लाख रुपये घेत होता. लग्न झाल्यानंतर नवरी एका आठवड्यातच घरातील मौल्यवान साहित्यावर डल्ला मारून गायब व्हायची. या प्रकारात अन्य संशयित सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यात रोशनी, रघुबीर, गोलू, मजबूत सिंह यादव, अर्जुन हेदेखील पिडीत आहेत.
विष्णुनंतर गब्बरसोबत केले लग्न
विष्णुच्या घरातून पळून अनुराधाने भोपाळमध्ये गब्बर नावाच्या युवकासोबत लग्न केले. त्याच्याकडूनही २ लाख रूपये घेतले होते. अनुराधाच्या अटकेसाठी पोलिसांनी सापळा रचला. एका पोलीस कॉन्स्टेबलला नवरा बनवून अनुराधासोबत लग्नासाठी पाठवले. जेव्हा एजेंटने अनुराधाचा फोटो दाखवला तेव्हा सापळा रचून तिला अटक करण्यात आली. या प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करत असून या टोळीत आणखी किती सहभागी आहेत याचाही शोध घेतला जात आहे.