अकोला दिव्य न्यूज : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साहवर्धन करण्याच्या हेतूने अकोला अर्बन को-ऑप. बँक लिमीटेड अकोला यांच्या वतीने शालांत परीक्षेत शाळास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष शंतनू जोशी, संचालक संजय कोटक, दिपक मायी, बँकेचे संचालक व प्रमुख वक्ते शार्दूल दिगंबर, मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के, उपमुख्य कार्यकारी विनोद अग्रवाल उपस्थित होते.

प्रास्ताविकात राजन सोनटक्के यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण व्हावी, त्यांच्या कष्टाचे कौतुक व्हावे यासाठी बँकेने पुढाकार घेतला आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे सांगितले. प्रमुख वक्ते शार्दूल दिगंबर यांनी आपल्या सांगितले की, मनुष्याच्या जीवनात १२ वर्षानी खरे यश मिळविण्यास सुरवात होते. आपण शाळेत प्रवेश घेतल्यापासून १२ वर्षानी १० वी चा पहिलं टप्पा येतो. इथे जे यश मिळते तिथून विद्यार्थांचे जग विस्तारत जाते. पुढे त्यांनी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर महापूरषांचे चरित्र वाचन करणे गरजेचे आहे. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन समर्पण, संकल्प, त्याग व देशसेवेचा वसा आपण घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास अकोला शहरातील २५ शाळांमधून प्रथम, द्वितीय आलेले ५६ गुणवंत विद्यार्थी, मुख्याध्यापक त्यांचे पालक, शिक्षकवृंद तसेच बँकेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “हा सन्मान आमच्या पुढील शिक्षण प्रवासात अधिक प्रेरणा देणारा आहे.” पालक आणि शिक्षकांनीही बँकेच्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश जोशी यांनी केले तर आभारप्रदर्शन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के यांनी मानले.