अकोला दिव्य न्यूज : BJP MLA Charged Over Gangrape : कर्नाटक पोलिसांनी बंगळुरु येथील भाजपाचे आरआर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार एन. मुनिरत्न यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पक्षातील एका कार्यकर्त्या महिलेवर सामूहिक बलात्कार घडवून आणल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरएमसी यार्ड पोलिसांनी ४० वर्षीय पीडितेच्या तक्रारीनंतर बंगळुरू येथे एफआयआर दाखल केला आहे. आमदार मुनीरत्न यांच्यासह, एफआयआरमध्ये त्यांचे सहकारी वसंता, चन्नकेशव, कमल आणि एका अज्ञात व्यक्तीला या प्रकरणात सह-आरोपी करण्यात आले आहे.

एफआयआरनुसार, पोलिसांनी बंगळुरू येथील रुग्णालयात पीडितेचा जबाब नोंदवला आहे, या रुग्णालयात सध्या पीडितेवर उपचार सुरू आहेत.
पीडितेने आरोप केला की २०१३ मध्ये, वैयक्तिक रागातून मुनिरत्न यांनी महिलेला वैश्या व्यवसाय केल्याच्या आरोप करत तुरूंगात टाकले होते. तिची सुटका झाल्यानंतर तिने दावा केला की आमदाराने सहकाऱ्यांच्या मदतीने तिला खूनाच्या गुन्ह्यात अडकवून तिला लक्ष्य केले, ज्यामुळे तिला पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला. ज्यानंतर महिनाभरात तिला जामीन मिळाला आणि ती बाहेर आली.
११ जून २०२३ मध्ये संध्याकाळी ७ वाजता दुसरा आणि चौथा आरोपी कथितपणे तिच्या घरी आले आणि तिला आश्वासन दिले की जर मुनिरत्न यांच्या कार्यालयात सोबत गेली तर तिच्या विरोधातील प्रलंबित खटले मागे घेतली जातील. दरम्यान पीडितेने आरोप केला आहे की मुनिरत्न यांच्या कार्यालयात तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले.
आमदाराने तिच्यावर पहिला, दुसरा आणि तिसर्या आरोपीकडून बलात्कार घडवून आणला. त्यानंतर मुनिरत्न याने तिच्या चेहर्यावर लघवी केली आणि तिला एका पदार्थाचे इंजेक्शन देण्यात आले आणि तिला जन्मभर यामुळे त्रास सहन करावा लागेल असे सांगण्यात आले, अशी माहिती एफआयआरमध्ये देण्यात आली आहे.
एफआयआरमध्ये असेही म्हटले आहे की, आमदाराने पीडितेला या घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती उघड करू नये अशी ताकीद दिली आणि त्याच्या सहकाऱ्यांना तिला घरी परत सोडण्यास सांगितले.
महिलेला पोटदुखीचा त्रास होऊ लागला…
१४ जानेवारी २०२५ रोजी पीडितेला गंभीर पोटदुखीचा त्रास होऊ लागला. रक्ताची तपासणी केली असता डॉक्टरांनी तिला विषाणूची लागण झाल्याचे सांगितले. व्हिक्टोरिया रुग्णालयात या निदानाची पुष्टी करण्यात आली. दरम्यान त्यानंतरच्या वैद्यकीय तपासणीनंतर तिला एक असाध्य आजार झाल्याचे सांगण्यात आले, अशी माहिती एफआयआरमध्ये देण्यात आली आहे.
अखेर वेदना सहन होत नसल्याने १९ मेच्या रात्री पीडित महिलेने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. ही बाब आढळून आल्यानंतर शेजार्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणात पोलिसांनी आयपीसी कलम ३७६ड (सामूहिक बलात्कार), २७०, ३२३, ३५४, ५०४, ५०६. ५०९ आणि ३४ या कलामांच्या अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे.