अकोला दिव्य न्यूज : गुजरातमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचं विमान कोसळल्याचं वृत्त समोर आलं आहे. या विमानात अनेक प्रवासी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्या ठिकाणी विमान कोसळलंय तिथून धुराचे लोट निघत असल्याचं दिसत आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल झाला असून ही खूप मोठी दुर्घटना असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेत किती हानी झाली आहे हे अद्याप समजलेलं नाही.

हे विमान रहिवासी भागात कोसळल्यामुळे मोठी हानी झाली असण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र त्याबाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे की या विमानात २४२ प्रवासी होते.
मोठी हानी झाली असण्याची शक्यता
एअर इंडियाच्या एआय-१७१ (बोइंग ७८७-८ ड्रीमलायनर विमान – सीरियल नंबर ३६२७९) या प्रवासी विमानाचा अपघात झाला. २४२ प्रवाशांना घेऊन हे विमान अहमदाबादवरून लंडनला जात होतं. तसेच यात दोन पायलटसह १२ क्रू सदस्य होते. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सीमेजवळच ही दुर्घटना घडली आहे. या विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काहीच मिनिटात ते कोसळलं. विमानाचे पंख तुटून बाजूला पडल्याचं व्हिडीओंमध्ये दिसतंय. दरम्यान, अहमदाबाद पोलीस व अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केलं आहे.