अकोला दिव्य न्यूज : शिक्षण, शाळा व योजना यांचा अपूर्व संगम म्हणजे एका प्रयोगशील शिक्षणाधिकार्याचं ‘नावीन्यातून नैपुण्य’ हे पुस्तक होय, ते प्रत्येक शाळेत आणि ग्रंथालयात पोहोचले पाहिजे, तसेच राज्यातील प्रथम पुरस्कार प्राप्त शाळेत हा प्रकाशन समारंभ होतोय ही शिक्षणक्षेत्रातील ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल,असे विचार सुप्रसिध्द साहित्यिक व माजी शिक्षणाधिकारी (जळगाव ) शशिकांत हिंगोणेकर यांनी व्यक्त केले. वाशिम रोड स्थित प्रभात किड्स स्कूल सभागृहात आयोजित शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर लिखित ‘नावीन्यातून नैपुण्य’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.

या प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रतिमाताई इंगोले, ज्येष्ठ कादंबरीकार तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे माजी सदस्य पुष्पराज गावंडे, प्रभात किड्स पब्लिकेशन्सचे प्रकाशक तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. गजानन नारे, संचालिका सौ. वंदना नारे, लेखिका डॉ. सुचिता पाटेकर, आनंद पाटेकर उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी डॉ. प्रतिमाताई इंगोले म्हणाल्या की, सध्या संवाद हरवत चालला असताना नवोपक्रमशील शैक्षणिक संवादातून शैक्षणिक गुणवत्ता विकासाचे परिमाण म्हणजे डॉ. पाटेकर यांचा ‘नावीन्यातून नैपुण्य’ हा ग्रंथ होय.
प्रभात किड्स पब्लिकेशन्सचे प्रकाशक डॉ. गजानन नारे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचा, शिक्षण क्षेत्रातील समृध्द अनुभवांचा दस्तऐवज असलेला ‘नावीन्यातून नैपुण्य’ हा शैक्षणिक ग्रंथ निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
युवा कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांनी डॉ.सुचिता पाटेकर यांच्या शैक्षणिक उपक्रमातील प्रतिभा शक्तीचा आपल्या भाषणात गौरवपूर्ण उल्लेख केला. तसेच नेर पं.सं. चे गटशिक्षणाधिकारी मंगेश देशपांडे, आमिन चव्हाण, मुकेश गोंडावर व प्रणिता गाढवे यांनीही समयोचित मनोगत व्यक्त केले. लेखिका डॉ. सुचिता पाटेकर यांनी ‘नावीन्यातून नैपुण्य’ या पुस्तकनिर्मितीची, विविध यशस्वी उपक्रमांची आनंदयात्रा विशद करुन या पुस्तकाच्या लेखनाने आत्मविश्वास दिल्याचे कृतज्ञतापूर्वक नमूद केले.
‘नावीन्यातून नैपुण्य’ या शैक्षणिक ग्रंथनिर्मितीसाठी सकारात्मक सहकार्य करणार्यांना ‘आनंदपत्र’ देऊन डॉ. सुचिता पाटेकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
प्रास्ताविक नीलेश कवडे तर आभार प्रदर्शन लताताई बाहाकर यांनी केले. संपूर्ण सूत्रसंचालन ‘प्रभात’ च्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख नंदकिशोर डंबाळे यांनी केले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील शिक्षण संचालक, मुख्याध्यापक, शिक्षणक्षेत्रात कार्यरत विद्याव्यासंगी, साहित्यक्षेत्रातील साहित्यिक व पत्रकार बांधव उपस्थित होते.
‘नावीन्यातून नैपुण्य’ हे शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांचे प्रभात किड्स पब्लिकेशन्स तर्फे प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माहितीनंतर क्यूआर कोड दिलेला आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, संदुर शाळा टप्पा-2’ मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त करणार्या “शैक्षणिक गुणवत्तेची शान, ‘प्रभात’ ला राज्यस्तरीय मान” या शीर्षकाची शैक्षणिक यशोगाथाही डॉ. सुचिता पाटेकर यांनी शब्दबध्द केली आहे.