Sunday, July 6, 2025
HomeUncategorizedअकोला जिल्ह्यातील बाजार समिती संचालकांची एक दिवसीय पणन विषयक कार्यशाळा

अकोला जिल्ह्यातील बाजार समिती संचालकांची एक दिवसीय पणन विषयक कार्यशाळा


अकोला दिव्य न्यूज : अकोला जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक व सचिव यांच्याकरिता एकदिवसीय पणन विषयक कार्यशाळा आज सोमवार २३ जुन रोजी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत एकूण ८० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.

सद्यस्थितीत राज्यातील बहुतांश बाजार समितीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून नवीन संचालक मंडळ कार्यरत झाले आहे. नूतन संचालकांना बाजार समितीचे कामकाज करीत असताना कलम 37 अन्वये बाजार फी चा उपयोग, बाजार समिती गुणांकन पद्धती, बाजार समितीच्या पायाभूत सुविधांकरिता केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना, बाजार समिती कार्यक्षेत्रातील कृषी उत्पादने व नियमन, कृषी पणन मंडळाच्या विविध योजना, बाजार समित्यांना असलेली खाजगी क्षेत्रातील आव्हाने व उपाय योजना अशा विविध विषयासंबंधी कार्यशाळेमध्ये तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.

राज्याचे पणन मंत्री ना. रावल यांच्या संकल्पनेतून व कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि संचालक, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे यांच्या मार्गदर्शनात कार्यशाळा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येत आहेत.
सदर कार्यशाळेमध्ये बाजार समित्यांनी उत्पन्न वाढीसाठी, प्रगतीसाठी व उन्नतीसाठी शासनाच्या विविध उपक्रमांचा व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक प्रविण लोखंडे यांनी केले. कलम ३७ अन्वये बाजार फी चा उपयोग व बाजार समितीचे गुणांकन पद्धती याबाबत सहायक निबंधक अभय कटके यांनी मार्गदर्शन केले. तर कृषी विभागाचे अधिकारी विलास वाशिमकर यांनी बाजार समिती कार्य क्षेत्रातील कृषी उत्पादने व नियमन या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, अमरावती विभागीय कार्यालयाचे उपसरव्यवस्थापक दिनेश डागा यांनी पणन मंडळाच्या विविध योजना व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या प्रशिक्षण संस्थे बाबत सादरीकरण केले.तसेच उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.

सदर कार्यशाळेस जिल्हा उपनिबंधक प्रवीण लोखंडे, सहायक निबंधक अभय कटके, कृषी विभागाचे तांत्रिक अधिकारी विलास वाशिमकर उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वीपणेपार पाडण्यासाठी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे सुधीर वाघ, दीपक साळुंखे व नितीन शेवाळे यांनी प्रयत्न केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!