गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : Swiss Bank Money स्विस बँकेत भारतीयांनी ठेवलेल्या पैशांबाबत नेहमीच गोंधळ, अंदाज व आरोप-प्रत्यारोप सुरू असतात. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आश्वासन दिलं होतं की, परदेशातील काळा पैसा भारतात परत आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा केले जातील. त्यानंतर २०१६ मध्ये नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला, त्यामागेही काळा पैसा बाहेर काढण्याचे कारण दिले गेले. पण ९ वर्षांनंतर पाहिलं, तर भारतात तो पैसा कुठेच दिसला नाही. उलट स्विस बँकेत भारतीयांचा पैसा वाढलाच आहे आणि तोही तिपटीने.

स्वित्झर्लंडच्या सेंट्रल बँकेने दिलेली आकडेवारी काय?
स्वित्झर्लंडच्या सेंट्रल बँकेनं दिलेल्या नुकत्याच आकडेवारीनुसार, २०२३च्या तुलनेत २०२४ मध्ये स्विस बँकेत भारतीयांनी ठेवलेली रक्कम जवळपास ३७,६०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ही आकडेवारी धक्कादायक आहे, कारण फक्त एक वर्षाच्या कालावधीत इतकी मोठी वाढ झाली आहे. २०२३ मध्ये ही रक्कम फक्त १.०४ अब्ज फ्रँक होती, पण आता तीन अब्जांपेक्षा अधिक झाली आहे. स्विस बँकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही वाढ विविध माध्यमातून झाली आहे. यात काही रक्कम थेट वैयक्तिक ग्राहकांकडून आली आहे, काही इतर बँकांतून हस्तांतरित झाली आहे, तर काही बॉण्ड्स आणि सिक्युरिटीजच्या माध्यमातून आली आहे.
पण या सगळ्या आकड्यांमागे एक प्रश्न कायम उभा राहतो की हा पैसा खरंच पांढरा आहे की काळा? स्वित्झर्लंडच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी स्पष्ट केलं आहे की, त्यांच्या देशात ठेवलेली कोणतीही रक्कम त्यांनी ‘काळा पैसा’ म्हणून मान्य केलेली नाही. तरीही भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये २०१८ पासून झालेल्या करारानुसार, बँक खात्यांबाबतची माहिती दोन्ही देशांत शेअर केली जाते. जर कोणते खातं संशयास्पद वाटलं, तर त्याची माहिती अधिकृतरीत्या भारत सरकारला दिली जाते. हे दाखवतं की, पारदर्शकतेकडे वाटचाल होत आहे, पण स्विस बँकेत भारतीयांचा पैसा वाढलाच आहे आणि तोही तिपटीने.काळ्या पैशांबाबतची शंका अजूनही दूर झालेली नाही.हे मान्यच करावे लागेल.
स्विस बँकेत कुणाला खाते उघडता येते?
अनेकांना वाटतं की फक्त अतिश्रीमंत किंवा उद्योगपतीच स्विस बँकेत खाते उघडू शकतात, पण ही अर्धवट माहिती आहे. कुणीही म्हणजे जगातील कुठल्याही देशातील नागरिक जर त्याचं वय १८ वर्षांपेक्षा जास्त असेल आणि आवश्यक कागदपत्रे आणि रक्कम त्याच्याकडे असेल, तर तो स्विस बँकेत खाते उघडू शकतो. अर्थात, काही बँका खातं उघडण्यासाठी किमान एक लाख स्विस फ्रँक (जवळपास ९० लाख रुपये) ठेवण्याची अट घालतात, त्यामुळे सामान्य माणसासाठी हे आव्हानात्मक ठरतं.
स्विस बँकेला प्राधान्य देण्यामागील कारणे
पण शेवटी प्रश्न राहतो व तो म्हणजे भारतातील काहीजण स्विस बँकेला इतकं प्राधान्य का देतात? यामागे कारणं अनेक असू शकतात. स्वित्झर्लंडने आतापर्यंत कोणत्याही युद्धात भाग घेतलेला नाही, त्यामुळे तिथे असलेल्या बँकांवर लोकांचा विश्वास आहे की, त्यांच्या संपत्तीला काहीही होणार नाही. शिवाय, स्विस फ्रँक ही चलनप्रणाली फार स्थिर मानली जाते आणि स्वित्झर्लंडमधील कायदे खूप कठोर असले तरी गोपनीयतेसाठी प्रसिद्ध आहेत. हे सर्व पैलू पाहता, अनेक श्रीमंत भारतीयांना वाटतं की त्यांचे पैसे अशा ठिकाणी ठेवलेले जास्त सुरक्षित असतात.
भारतामध्ये मात्र स्विस बँक हा नेहमी एक राजकीय व सामाजिक मुद्दा राहिला आहे. निवडणुका आल्या की काळ्या पैशाचा मुद्दा ऐरणीवर येतो, पण निवडणुका गेल्यावर तो हळूहळू विस्मरणात जातो. आजही भारतीय जनतेच्या मनात एक आशा आहे की स्विस बँकेत दडवलेला पैसा एक दिवस भारतात परत येईल. पण तो दिवस कधी येईल, हे मात्र अजूनही धूसर आहे.