अकोला दिव्य न्यूज : Iran Israel War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण यांच्यात शस्त्रविराम झाल्याची घोषणा केली. दोन्ही देशांशी चर्चा केली आणि दोन्ही देशांनी यासाठी सहमती दर्शवली असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. मात्र इराणकडून डोनाल्ड ट्रम्प यांचा दावाफेटाळण्यात आला. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी इराण व इस्रायलमध्ये शस्त्रविराम झाल्याचा दावा फेटाळला. सध्या असा कोणताही करार झालेला नाही, असे अराघची यांनी म्हटले आहे.

इराणने काय म्हटलं आहे?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इस्रायल इराणमध्ये शस्त्रविरामाची घोषणा केल्यानंतर र काही तासांनी म्हणजे पहाटे ४.१६ वाजता इराणी परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सोशल प्लॅटफॉर्म X वर आपला संदेश पोस्ट केला. ते म्हणाले, अजून युद्धबंदी किंवा लष्करी कारवाया संपवण्याबाबत कोणताही करार झालेला नाही.इराणवर इस्त्रायलने हल्ले सुरू केले होते. इराणने केवळ स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तर दिले. यामुळे युद्ध थांबवण्याची जबाबदारी देखील इस्रायलवर आहे. इस्रायलला प्रथम हल्ले थांबवावे. इस्रायलने हल्ले थांबवले तर इराण देखील प्रत्युत्तर देणार नाही, असं इराणने म्हटलं आहे.
इराणच्या वृत्तसंस्थांनीही नाकारलं शस्त्रविरामाचं वृत्त
इराणच्या वृत्तवाहिन्या तसंच वृत्तपत्रांनीही शस्त्रविराम झालेला नाही असं म्हटलं आहे. तेहरान टाइम्समध्ये एक लेख प्रकाशित करण्यात आला आहे. त्यामध्ये इराणने शस्त्र विरामावर सहमती झालेली नाही असं म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत असाही उल्लेख त्यात करण्यात आला आहे. ट्रम्प काहीतरी वक्तव्य करुन इराणमध्ये संभ्रम पसरवू पाहात आहेत. तर मेहेर या इराणच्या वृत्तसंस्थेने खोटारड्या ट्रम्पने केली इराण इस्रायलच्या शस्त्रविरामाची घोषणा अशी हेडलाइनच चालवली आहे. इस्रायलच्या सैन्यांकडून हल्ले सुरु आहेत. अशात ट्रम्प शस्त्र विरामाच्या गोष्टी कशा काय करतात? असाही सवाल या वृत्त संस्थेने विचारला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा काय ?
मागील काही दिवसांपासून सुरू असलेले इराण व इस्रायलमधील युद्ध आता थांबणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमध्ये शस्त्रविराम झाल्याची घोषणा केली आहे. शस्त्रविरामाची घोषणा करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये म्हटले की, “सर्वांचे अभिनंदन! इस्रायल आणि इराण यांनी १२ तासांसाठी शस्त्रविरामास पूर्णपणे सहमती दर्शवली असून या काळात दोन्ही देश त्यांच्या अंतिम मोहिमा पूर्ण करतील. त्यानंतर हे युद्ध संपले आहे, असे अधिकृतपणे मानले जाईल.” दरम्यान इराणने ही घोषणा नाकारली आहे. तसंच शस्त्रविरामाबाबत डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलत आहेत असंही म्हटलं आहे.