अकोला दिव्य न्यूज : कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या अकोला पोलिसा प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या पोलिसांच्या निवासस्थानाचा अतिक्रमणकर्त्यांनी चक्क ताबा घेतला आहे. शहरातील एक नव्हे चक्क दोन-तीन वसाहतीलमधील पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जुन्या निवासस्थानात काही लोकांनी आपला संसार राजरोसपणे थाटला आहे. मात्र त्यांच्यावर पोलिस प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. पोलिस आपल्याच घरातील अतिक्रमण काढण्यास सक्षम नसेल तर ते शहरातील इतर अतिक्रमण काय काढतील? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हा मुद्दा उचलला असून यासाठी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई का करण्यात येऊ नये असा प्रश्न त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांना विचारला आहे. याप्रकरणी ते काय कारवाई करतात याकडे अकोलेकरांचे लक्ष लागून आहे.
अकोला शहरातील पोलिसांच्या जागेवरी कुठे-कुठे? अतिक्रमण झालेले आहे? अशी विचारणा आसरा सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी-अधिकारी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी केली होती. रितसर माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करून ही माहिती मागितली. त्यात पोलिस विभागाने कुठेही अतिक्रमण झालेले नाही, असे उत्तर दिले. पोलिस वसाहतीतील अनेक निवासस्थानात अतिक्रमण झालेले असताना, तसेच पोलिसांची जागा बळकाविलेली असताना दिशाभूल करणारे उत्तर पोलिस प्रशासनाच्या वतीने दिले गेले. त्यामुळे दिशाभूल करणाऱ्या आणि अतिक्रमणास दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का करण्यात येऊ नये असा प्रश्न संघटनेने केला आहे.
बागेच्या देवी मंदिरासमोरील पोलिस लाईनच्या दोन निवासस्थानात लोकांनी ताबा घेतला आहे. तसेच वसंत टॉकीज समोरील जागेवर अतिक्रमण आहे. यासोबतच येथे ७ ते ८ दुकानदारांनी अतिक्रमण करून ठेवलेले आहे. अनिकट पोलिस लाईनमध्ये मंदिराच्या नावाखाली अतिक्रमण झालेले आहे.देखभाल आणि दुरूस्तीसाठी आलेल्या निवासस्थानात लोकांनी राजरोस अतिक्रमण केलेले पोलिसांना दिसत नसेल का? कि त्यांचे या बाबीला अभय आहे. असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. पोलिस विभागातील काही अधिकाऱ्यांच्या मर्जीने हे अतिक्रमण होत असून त्याची सखोल चौकशी करण्यात यावी. सोबतच जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
सेवानिवृत्तांच्या कुटुंबीयांची न्यायीक मागणी
अकोल्यातील पोलिस लॉन आणि पेट्रोल पंपांवर ईतर लोकांना रोजगार दिला जात आहे. सेवानिवृत्त पोलिस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे. या मुलांना पोलिसांच्या जागेत रोजगाराची संधी द्यावी किंवा पेट्रोल पंपावर त्यांना नोकरीवर घ्यावे, अशी मागणी देखील या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.