अकोला दिव्य न्यूज : शेतीच्या वादातून जन्मदात्या आईच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेला फरार आरोपी मुलगा विनोद तेलगोटेला पोलिसांनी तीन महिन्यांनंतर पुणे जिल्ह्यातून अटक केली.आई बेबाबाई उर्फ गोकर्णाबाई तेलगोटे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. वडिलांनाही गंभीर जखमी केले होते. पोलिसांनी विनोद विरोधात गुन्हा दाखल केला होता. अप नंबर 77/25 128(2) 352,103(1) बीएनएस प्रमाणे गुन्हा नोंदवला गेला. उपचारादरम्यान, जखमी बेबाबाई उर्फ गोकर्णाबाई तेलगोटे यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्याच्याकडे मोबाईल किंवा आधार कार्ड काहीच नव्हते.

पोलिस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांनी आरोपीला शोधण्यासाठी एक टीम तयार केली. राहुल तायडे बन 899 आणि पोलीस कॉन्स्टेबल सतीश भटकर बंड 273 यांनी माहिती काढली. आरोपी पुणे येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक पुण्याला रवाना झाले. पण आरोपी खूप हुशार होता. तो सतत आपले ठिकाण बदलत होता. तो मोबाईलवरून कोणालाही संपर्क करत नव्हता. आपण कुठे राहतो हे तो कुणाला सांगत नसे. त्यामुळे पोलिसांना त्याला पकडण्यात यश येत नव्हते. पोलिसांनी हार मानली नाही. त्यांनी शोध सुरूच ठेवला. त्यांनी गुप्त बातमीदारांची मदत घेतली. आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवले. दरम्यान पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की आरोपी एका चायनीजच्या दुकानात काम करत होता. तो वाकळी, जिल्हा अहिल्यानगर येथे असल्याची माहिती मिळाली. तेव्हा वाकळीला जाऊन तेल्हारा पोलिसांनी आरोपीला अटक केली.
१९ मार्च रोजी विनोदने आई-वडिलांशी शेतीच्या हिश्यावरून भांडण केले. त्याने दोघांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. यात त्याची आई बेबाबाई ऊर्फ गोकर्णा तेलगोटे जखमी झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विजय तेलगोटे यांनी पोलिसात तक्रार नोंदवली. तक्रारीनुसार, आरोपी विनोदला दारूचे व्यसन आहे. तो आई-वडिलांशी शेतीच्या हिश्श्यावरून आणि पैशांवरून नेहमी भांडण करत असे.१९ मार्चच्या रात्री त्याने रागाच्या भरात आई-वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भटकर करत आहेत.