अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्या वर्षी १० टक्के आणि टप्प्या टप्प्याने कपात करीत ५ वर्षांत २६ टक्के वीजदर कमी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिला आहे. या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांनी पहिल्या वर्षी १० टक्के आणि टप्प्या टप्प्याने कपात करत ५ वर्षात २६ टक्के वीज दर कमी होणार असल्याची माहिती दिली आहे. महावितरण विभागाच्या याचिकेवर यासंबंधीचा निर्णय वीज नियामक आयोगाने दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.

साधारणत: पूर्वीचा काळ पाहिला तर १० टक्के वीजदरवाढीच्या याचिका सादर व्हायच्या. पण, इतिहासात प्रथमच वीजदर कमी करण्यासाठी महावितरणाने याचिका दाखल केली. या याचिकेवर एमईआरसीने आदेश दिला. या आदेशाने घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीतील वीज ग्राहकांना याचा लाभ होणार आहे.
राज्यात १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्यांचे प्रमाण हे ७० टक्के आहे. त्यांच्यासाठी १० टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील.असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.आमच्या बळीराजाला दिवसा आणि खात्रीचा वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सोबतच आगामी काळात वीज खरेदी करारांमध्ये हरित ऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे वीज खरेदी खर्चात बचत होणार आहे. त्यामुळेच हा दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणला मांडता आला. ही बातमी राज्यातील जनतेला देताना मला आनंद होतो आहे,असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.